काँग्रेसचा दलित चेहरा म्हणून देशात ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे ज्या लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात, त्या सोलापुरात स्वच्छता कामगारांची स्थिती दयनीय आहे. त्यांचे जीवन म्हणजे नरकयातनाच आहेत, अशा शब्दात राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य श्यौरान जीवन (नवी दिल्ली) यांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात आपण गंभीर दखल घेऊन प्रशासनातील संबंधितांवर कठोर कारवाई होण्यासाठी पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी आयोजित बैठकीत सोलापूर महापालिकेसह जिल्ह्य़ातील विविध नगरपालिकांच्या कार्यकक्षेतील सफाई कामगारांच्या परिस्थितीचा श्यौराज जीवन यांनी आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम व निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांच्यासह सोलापूर महापालिकेचे संबंधित अधिकारी व सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सोलापूर जिल्ह्य़ातील सफाई कामगारांची स्थिती विदारक असल्याचे श्यौराज जीवन यांनी नमूद केले. शहरतील सफाई कामगारांच्या वसाहतींनी भेट देऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी बऱ्याच असुविधा आढळून आल्या. घरांची स्थिती दयनीय असून पावसाळ्यात पावसाचे पाणी घरात येते. अस्वच्छ क्षेत्रात सफाईची कामे करणाऱ्या कामगारांना मास्क, हॅन्डग्लोज, पोशाख, साबण आदी साहित्य वेळेवर मिळत नाहीत. सेवानिवृत्त होऊन दोन वर्षे उलटली, तरी निवृत्तिवेतन मिळत नाही, लाड समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जाते, सफाई कामगारांच्या पाल्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नाही यासह विविध प्रश्नांचा पाढा त्यांनी वाचून दाखविला.
देशात व राज्यात मैला डोक्यावरून नेण्याची अमानवी प्रथा नष्ट झाल्याचा दावा शासनाकडून केला जात असला, तरी पंतप्रधान कार्यालयातून उपलब्ध माहितीनुसार अजूनही सात लाख ९४ हजार कर्मचाऱ्यांना मैला डोक्यावरून वाहून न्यावा लागतो. यात चार लाख ९७ हजार कामगार कुटुंबीयांना या कामासाठी डुकरासारख्या प्राण्यांची मदत घ्यावी लागते, अशा शब्दात त्यांनी सफाई कामगारांची विदारक स्थिती विशद केली. राज्यात अद्याप दोन लाख ९ हजार सफाई कामगारांना खुल्या जागेवररून मैला उचलावा लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या प्रश्नावर राष्ट्रीय सफाई कामगार आयोग बघ्याची भूमिका घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.