सकाळी आलेल्या पावसामुळे मतदानाची कमी असलेली टक्केवारी, निसर्गाने साथ दिल्याने दुपारनंतर त्यात झालेली वाढ, ग्रामीणमधील तरुणाईमध्ये मतदानाविषयी प्रचंड उत्साह, वृद्धांचाही उल्लेखनीय सहभाग, मतदान केंद्रावर वाहनांद्वारे आणले जाणारे मतदार, काही ठिकाणी उमेदवारांचे छायाचित्र असलेले पोस्टर्स, हे चित्र ग्रामीण भागातील मतदान केंद्र व पक्षांच्या बुथवर दिसून आले.   ढगाळी वातावरणात आजची सकाळ उजाडली. सकाळीच परशिवनी, रामटेक आणि सावनेर तालुक्यातील काही भागात जोरदार तर काही भागात तुरळक पाऊस पडल्याने मतदार सकाळी घराबाहेर पडले नाहीत. दुपारनंतर मात्र मतदार घराबाहेर पडलेत. काही मतदान केंद्रावर गर्दी तर काही मतदार केंद्रात तुरळक तर काही मतदान केंद्र ओस पडलेली दिसून आली. तरुणाईमध्ये मात्र मतदानाविषयी उत्साह दिसून आला. उमेदवारांविषयी त्यांची मते स्पष्ट होती. कामठीतील सरस्वती शिशू मंदिर मतदान केंद्रात अश्विनी आनंद रामगीरवार, मनसर येथील जि.प.प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर कल्याणी डेहरीया, रामटेकमधील समर्थ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दीक्षा धमगाये आणि सोनाली अंबादे, पारशिवनी येथील हरिहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अपेक्षा वंजारी, तर सावनेर येथील नगरपरिषदेच्या सुभाष मराठी शाळेत वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या साची सुधाकर बागडे यांनी प्रथमच मतदानाचा अधिकार बजावला. या सर्वानीच आपल्या मतदार संघाचा विकास करणारा, रोजगार उपलब्ध करून देणारा, भ्रष्टाचार न करणाराष थापा न मारणारा, गुंडगिरी न करणारा उमेदवार असावा, अशी अपेक्षा केली.
तरुणाप्रमाणेच कामठीतील प्रभावती उरकुडे (७५), नरेंद्र मिश्रा (८४), मनसर येथील सुंदराबाई टंटूराम अमृते (८०), येथीलच नत्थू गणपत श्रीरामे (८५), रामटेक येथील सईबाई बर्वे (१००)तर पारशिवनी येथे यमुमाबाई शामरावजी बर्वे (८०) या वृद्धांनी मतदान केंद्रात जाऊन मतदान केले व तरुणाईपुढे आदर्श ठेवला. रामटेक येथील राष्ट्रीय आदर्श विद्यालयात रत्नमाला संजय काटकर या मतदानासाठी आल्या. त्यांच्याजवळ मतदान ओळखपत्र आणि व्होटर स्लीप होती. असे असतानाही मतदार यादीत नाव नसल्याने त्यांना परत जावे लागले. मतदानाचा अधिकार बजाऊ न शकल्याने मला अत्यंत वाईट वाटत असल्याचे त्यांनी लोकसत्ताच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
मतदान केंद्राच्या परिसरात सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे बुथ असतात. पावसामुळे कार्यकर्त्यांना हे बुथ घेऊनच पलायन करावे लागले. त्यानंतर जेथे कुठे जागा मिळेल, तेथे बुथ मांडावे लागले. त्यामुळे घरांच्या आडोशाला, तर घराच्या ओसरीतच बुथ मांडण्याचा प्रसंगही कार्यकर्त्यांना आला. दुपारी या बुथवरील कार्यकर्ते आलुबोंडा व समोस्याचा आस्वाद घेताना दिसून आले. तर काही ठिकाणी पक्षाकडून जेवण देण्यात आले. अनेक बुथवर संगणकाचा वापर होत असल्याचेही दिसून आले. सावनेर येथील राजकमल हॉटेल परिसर व याच चौकात असलेल्या बुथवर संगणकाद्वारेच मतदाराला व्होटर स्लीप दिली जात होती. कन्हान येथील शहर कांग्रेसच्या कार्यालयात काँग्रेसचे उमेदवार सुबोध मोहिते, तसेच मनसेचे योगेश वाडीभस्मे, कांद्री व वाईटोला येथे राष्ट्रावादीचे डॉ. अमोल रणजित देशमुख यांचे पोस्टर्स झळकत होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हे पोस्टर्स दिसले नाहीत काय, असा प्रश्न उपस्थित होत होता. अनेक मतदान केंद्रांच्या परिसरात विशिष्ट पक्षाचे चिन्ह व रंग असलेले दुपट्टे गळ्यात घालून कार्यकर्ते दिसून येत होते. पावसामुळे अनेक मतदान केंद्र परिसरात चिखलाचे साम्राज्य परसले होते. प्रत्येक प्रमुख उमेदवारांनी मतदारांना मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. रामटेकमधील कांद्री येथील मतदान केंद्रावर तेलंगना राज्याचे सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले होते. रामटेकचे माजी आमदार आनंदराव देशमुख यांनी समर्थ हायस्कूलमधील १२४ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर येऊन मतदान केल्याची माहिती येथील मतदान केंद्र अधिकारी प्रमोद निनावे यांनी दिली.