लहानपणापासून गोष्टींमधून भेटणाऱ्या हरीण, शेळी, ससा अशा गरीब प्राण्यांबाबत नव्हे तर वाघ-सिंहासारख्या हिंस्र पशूंबद्दलही अनेकांना प्रेम वाटते. त्यामुळेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने जाहीर केलेल्या वन्यप्राणी दत्तक योजनेला प्रतिसाद देत मुंबईकरांनी वाघ, सिंह, जंगली मांजर, चितळ, भेकर यांना दत्तक घेतले. मात्र मानवी वस्तीत घुसणाऱ्या बिबळ्याविषयी नकारात्मक भावना तयार झाल्याने बिबळ्याला दत्तक घेण्यासाठी कोणी पुढे आलेले नाही.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जैवविविधताही भरपूर आहे. नागरिकांना या उद्यानाशी तसेच येथील वन्य पशूपक्ष्यांशी जोडण्यासाठी अनेकविध योजना राबवल्या जात आहेत. उद्यानात असलेल्या वाघ, सिंह, बिबळे, हरीण, भेकर या प्राण्यांना दत्तक घेण्याची योजना ही त्यापैकीच एक. या योजनेअंतर्गत ९ वाघ, ४ सिंह, २१ बिबळे, ३२ चितळ, ५ जंगली मांजरे, दोन नीलगाय आणि एक भेकर दत्तक देण्याचे ठरले. या प्राण्यांचा एका वर्षांचा खर्च देऊन त्यांना वर्षभरासाठी दत्तक घेतले जाऊ शकते. या काळात पालकाला दर आठवडय़ाला एकदा या प्राण्यांना भेटता येते तसेच या प्राण्यांच्या पिंजऱ्यावर पालकांचे नाव लावले जाते. सिंह, वाघ या प्राण्यांचा वर्षभरातील खर्च सुमारे तीन लाख रुपये असून भेकर, चितळ यांच्यासाठी अनुक्रमे वीस व तीस हजार रुपये खर्च आहे. एक बिबळ्या दत्तक घेण्यासाठी एक लाख २० हजार रुपये खर्च करावे लागतात. ही योजना सुरू झाल्यावर दहिसर येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल शाळेतील मुलांनी सर्वात आधी चितळ दत्तक घेतले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एका वाघ, तेजस ठाकरे यांनी दोन जंगली मांजरे दत्तक घेतली. सिद्धार्थ ठाकूर यांनी सिंह तर गाला कन्स्ट्रक्शनने चितळ आणि भेकर दत्तक घेतले.
आम्ही दत्तक देत असलेल्या प्राण्यांच्या प्रत्येक प्रकारातील किमान एक प्राणी दत्तक घेतला गेला आहे. मात्र संख्येने अधिक असून आणि तुलनेने खर्च कमी असूनही बिबळ्याला दत्तक घेण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही, असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता म्हणाले. मानवी वस्तीत घुसून उपद्रव करत असल्याने मुंबईकरांच्या मनात बिबळ्याविषयी अढी आहे. त्यामुळेच कदाचित त्याचा सांभाळ करण्यासाठी कोणी इच्छा दाखवली नाही. मात्र बिबळ्या हा जैवविविधतेतील महत्त्वाची साखळी आहे. तोदेखील टिकायला हवा, असे मत गुप्ता यांनी व्यक्त केले.
बीएनएचएसलाही अनुभव
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून पर्यावरणाच्या विविध विषयांवर कॉफी टेबल पुस्तक प्रकाशित करण्यात येतात. ‘लाइव्ह ज्वेल ऑफ इंडियन जंगल’ या सहा वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातील प्राणी-पक्ष्यांची पूर्ण पानभर छायाचित्र दत्तक घेण्याची योजना राबवली गेली होती. त्यावेळी पुस्तकातील पांढऱ्या घुबडाच्या छायाचित्राला बराच काळ पालक मिळत नव्हता. भारतीय संस्कृतीत घुबडाला अपशकुनाचे प्रतीक मानले जात असल्याने त्याच्यासाठी कोणी पुढे आले नव्हते. मात्र अखेरीस घुबडाला पालक भेटला.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jun 2014 रोजी प्रकाशित
बिबळ्या दत्तक? नको रे बाबा!
लहानपणापासून गोष्टींमधून भेटणाऱ्या हरीण, शेळी, ससा अशा गरीब प्राण्यांबाबत नव्हे तर वाघ-सिंहासारख्या हिंस्र पशूंबद्दलही अनेकांना प्रेम वाटते.
First published on: 14-06-2014 at 06:31 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbaikar not interested to adopt leopard