मालेगावच्या मुश्रीफ खानने येथील यशवंत व्यायाम शाळेच्या मैदानावर नाशिक बॉडीबिल्डींग अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या वतीने आयोजित ४० व्या ‘नाशिक श्री’ स्पर्धेत विजेतेपद मिळविले. तर, नाशिकच्या दुर्गा जाधवने व्दितीय ‘मिस् फिटनेस नाशिक’ चा मान मिळविला.
स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय खेळाडू किशोर सरोदे व श्रीराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे राज्यस्तरीय सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. एकंदरीत सहा गटात पार पडलेल्या या स्पर्धेत गटवार विजेत्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अंतिम लढत मालेगावच्या मुश्रीफ खान आणि नाशिकच्या महेश टोचे यांच्यात रंगली. अटीतटीच्या लढतीत मुश्रीफने बाजी मारली. तर, महेश टोचे यांस ‘उत्कृष्ठ प्रदर्शनकारी’ म्हणून गौरविण्यात आले. जहीर अजुंम स्पर्धेतील सर्वात प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटू ठरला. स्पर्धेचे बक्षिस वितरण डॉ. अनिरूध्द धर्माधिकारी, संघटनेचे कायदेशीर सल्लागार विशाल वावरे, सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सूत्रसंचालन राजेंद्र सातपूरकर  व सारंग नाईक यांनी केले. गुणलेखकाचे काम किशोर सरोदे यांनी केले.