‘आम्हाला नाही मिळाले तर मग तुम्हालाही नाही मिळू देणार’ अशा प्रवृत्तीतून अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या नगर शाखेने नियोजित जिल्हा सांस्कृतिक महोत्सवावर पाणी टाकणे सुरू केले आहे. खासदार दिलीप गांधी यांच्या माध्यमातून त्यांनी आज थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘जिल्ह्य़ातील दुष्काळी स्थितीमुळे जिल्हा सांस्कृतिक महोत्सवाचे ५ लाख रूपयांचे अनुदान दुष्काळ सहायता निधीत वर्ग करावे’ असे पत्र देण्याचा प्रयत्न केला. येत्या दि. २४ पासून हा महोत्सव घेण्याचे नियोजन आहे.
खासदार गांधी यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले किंवा नाही ते समजू शकले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यांच्यावर या महोत्सवाची जबाबदारी सोपवली आहे त्या उपजिल्हाधिकारी अजय मोरे यांनी असे पत्र वगैरे दिल्याची माहिती नाही, मात्र तसा काहीही निर्णय झालेला नाही असे सांगितले. सरकारने ज्या कामासाठी निधी दिला त्याच कामासाठी तो वापरावा लागतो, अन्य कशासाठी तो वापरता येणार नाही व तसे काही कारणही दिसत नाही असे ते म्हणाले.
असे पत्र देणाऱ्या नाटय़ परिषद नगर शाखेनेच या महोत्सवातील कार्यक्रमांचे नियोजन सुचवले होते हे विशेष! त्यांच्याशिवाय नाटय़ परिषदेच्या शेवगाव शाखेनेही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या महोत्सवाच्या आयोजनासाठी काही कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सुरू केला होता. या नियोजनासंबधीच्या पहिल्याच बैठकीत ती शाखा व ही शाखा यांच्यात कोणते कार्यक्रम कोणी घ्यायचे, कोणाचे अंदाजपत्रक किती याची ठिणगी पडली व हा अनुचित प्रकार सुरू झाला.
सगळे काही आमच्याकडूनच व्हायला हवे या इष्र्येतून या महोत्सवाच्या नियोजनावरच संक्रात आणण्याचा अनुचित प्रयत्न सुरू झाला आहे. काही कार्यक्रम यांना व काही त्यांना, काही सांस्कृतिक क्षेत्रातील आणखी कोणा दुसऱ्यांना असा मोरे यांचा विचार सुरू आहे. त्यादृष्टिने ते काहीजणांबरोबर चर्चाही करत आहेत. मात्र त्यापुर्वीच आपल्याला सगळे कार्यक्रम करायला मिळणार नाही असे वाटून हे असे महोत्सवच रद्द करा म्हणणारे पत्र खासदार गांधी यांच्याकडे देण्यात आले आहे.