शिर्डी नगरपंचायतीच्या माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष अभय शेळके उद्या, शुक्रवार त्यांच्या समर्थकांसह मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यामुळे शिर्डीचा विकास खुंटल्याने आपण विकासाच्या मुद्यावर आगामी विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून शिर्डी विधानसभा मतदारसंघातून लढविणार असल्याचे शेळके यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
शेळके यांनी सांगितले, की शिर्डी विधानसभा मतदारसंघात मूलभूत सुविधांपासून जनता वंचित आहे. अकार्यक्षम लोकप्रतिनिधींमुळे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शिर्डी देवस्थानामार्फत विविध सोयीसुविधा उभ्या राहू शकल्या नाहीत. गणेश कारखाना बंद पडला. गोदावरी कालव्यांचे पाणी शेतीला मिळत नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. निळवंडेचे कालवे व चाऱ्या लोकप्रतिनिधी जाणूनबुजून होऊ देत नाही. पेरूचे आगार असलेल्या गणेश परिसरात प्रक्रिया उद्योगांची उभारणी न झाल्याने शेवटच्या घटका मोजण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. विखे कारखाना कर्जमुक्त झाला आणि सर्वाधिक साखर उतारा मिळूनदेखील संगमनेर कारखान्यापेक्षा चारशे रुपये टन कमी भाव कसा देतो? ऊसदर, निळवंडे कालवे आणि मतदारसंघाचा विकास हेच आपले पुढील ध्येय असेल.
राष्ट्रवादीने आपल्याला भरपूर दिले, मात्र जनतेच्या वेदना सहन होत नसल्याने आपण शिवसेनेत प्रवेश करीत आहोत, असे सांगून शेळके म्हणाले, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वरिष्ठ सेना नेत्यांसह जिल्हा व तालुकाप्रमुख यांची भेट घेऊन हा निर्णय घेतला. अनेक जण उमेदवारीसाठी उत्सुक आहेत, परंतु पक्षप्रमुख ठाकरे यांनी उमेदवारीबाबत आपणास शब्द दिला आहे. या वेळी शिवसेनेचे शिर्डी शहरप्रमुख सचिन कोते, राहाता शहरप्रमुख गणेश सोमवंशी उपस्थित होते.