केंद्रीय कृषिमंत्री तथा माढय़ाचे खासदार शरद पवार तब्बल चार वर्षांनंतर आपल्या भेटीस येत असल्याचे समजल्यावरून सांगोला मार्गातील अनेक मतदारांनी रस्त्यात उभ्या उभ्या भेटून आपल्या मागण्यांची निवेदने सादर केली. खासदारांनी प्रत्येक ठिकाणी १ ते २ मिनिटांचा वेळ दिला. मात्र तेवढय़ाही भेटीने मतदार भारावले.
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर एकदा अकलूजला प्रचारसभा घेतली, तर निमगाव (ता. माढा) येथे निवडीनंतरची आभार सभा घेतली. त्यानंतर खा. पवार हाताच्या बोटावर मोजण्याएवढय़ा वेळा मतदारसंघात आले. त्यापैकी चार वेळा त्यांनी सांगोला येथे आ. दीपक साळुंखे यांच्याकडेच मुक्काम केला. एकवेळ सांगोल्याहून बारामतीला जाताना, तर दुसऱ्यांदा मंगळवेढय़ाहून बारामतीला जाताना चहापाण्यासाठी अकलूजच्या केवळ शिवरत्न बंगल्यास भेट दिली. म्हणजे प्रचार व आभार सभेनंतर त्यांची मतदारसंघात जाहीर सभाही झाली नाही. पंढरपूर तालुक्यातील शेळवे व अकलूजला दुष्काळी आढावा बैठकीच्या निमित्ताने आले असले तरी ते केवळ पुढारी व अधिकाऱ्यांनाच भेटले. त्यामुळे मतदारांचा पुरता भ्रमनिरास झाला होता.
सांगोला तालुक्यातील दुष्काळ व त्यानंतर झालेले पाऊसपाणी याची पाहणी करण्यासाठी श्री. पवार यांनी रविवारी उशिरा नियोजन केले. त्यानुसार सोमवारी ते मोटारीने वालचंदनगरवरून नातेपुते, माळशिरस, वेळापूर, मळोलीमार्गे सांगोल्याकडे गेले. या दौऱ्याची संबंधितांशिवाय कुणाला कसलीही कल्पना नव्हती व ज्यांना वर्तमानपत्रातील बातम्यांवरून समजले, ते लोक मागण्यांची निवेदने घेऊन रस्त्यावर उभे राहिले होते. अशा ठिकाणी गाडी उभी करून एखादे मिनिट थांबून व निवेदन घेऊन पवार पुढे मार्गस्थ होत होते. वेळापूर येथे माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील यांना घेऊन ते सांगोल्यास गेले. कित्येक ठिकाणी ते गाडीतून उतरलेही नाहीत.