उपराजधानीतील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले पोलीस आयुक्त के.के. पाठक यांची उचलबांगडी न करता नियमित बदली करून त्यांची प्रतिष्ठा जपण्याचा उद्योग नव्या सरकारने चालवला आहे. हा प्रकार येथील वाढत्या गुन्हेगारीमुळे आधीच त्रस्त झालेल्या नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखाच आहे.
वाढत्या गुन्हेगारीमुळे या शहराची प्रतिमा संपूर्ण राज्यात मलीन झाली आहे. राज्याला स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री देणारे हेच ते शहर का? असा प्रश्न कुणालाही पडावा एवढे या गुन्हेगारीचे स्वरूप भयावह झाले आहे. काल मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या घरापासून अगदी जवळ भरचौकात एका तरुणाचा खून करण्यात आला. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी गुंडांनी एकत्र येत २१ घाव घालून या तरुणाला ठार केले. जिथे ही घटना घडली तो परिसर अतिशय सुरक्षित व शांत म्हणून ओळखला जातो. सव्वा महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ झालेल्या गोळीबारात एक व्यापारी ठार झाला होता. वर्दळीच्या ठिकाणी गुंड हातात शस्त्र घेऊन येतात व खून करतात. यावरून या शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले आहेत हे स्पष्ट झाले आहे. येथील गुंडांना पोलिसांचा धाकच उरलेला नाही हे यासारख्या अनेक घटनांवरून याआधीही स्पष्ट झाले आहे. या वाढत्या गुन्हेगारीला येथील निष्क्रिय पोलीस यंत्रणा व त्याचे प्रमुख असलेले आयुक्त जबाबदार आहेत हे अनेकदा स्पष्ट होऊन सुद्धा या आयुक्तांना सरकारकडून पाठीशी घालण्यासाठी नवनवी कारणे शोधली जात असल्याची बाब आता समोर आली आहे. राज्यात लवकरच भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. राज्यात सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात मोठय़ा प्रमाणावर फेरबदल सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस दलात सुद्धा बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नियमित बदलीच्या काळातच आयुक्त पाठक यांना बदलले जाईल, असे गृहखात्यातील सूत्रांचे म्हणणे आहे. पाठक यांचा कार्यकाळ पूर्ण होत आला आहे. त्यामुळे येथील कर्तव्यात आलेले अपयश बघून नाही तर कार्यकाळ पूर्ण झाला म्हणून त्यांची बदली करण्यात येईल असे या सूत्राचे म्हणणे आहे. हा प्रकारच या पोलीस प्रमुखांचे अपयश झाकण्यासारखा आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात अपयश आले. असे कारण देत त्यांची उचलबांगडी केली असती तरी येथील गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या दलातील इतर अधिकाऱ्यांवर वचक बसला असता. मात्र, तसे न करता नियमित बदली करून त्यांची प्रतिष्ठा जपण्याचा प्रकार सरकार दरबारातील वरिष्ठांनी चालवला आहे. त्यामुळे पुन्हा आता या पोलीस प्रमुखावर एवढी मेहेरनजर कशासाठी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री या शहराचे नागरिक असले तरी अजून एकदाही त्यांनी येथील वाढत्या गुन्हेगारीवर जाहीर चिंता व्यक्त केली नाही. आढावा घेताना अधिकाऱ्यांना या मुद्दय़ावरून धारेवर धरण्याचा प्रकारही त्यांच्याकडून घडल्याचे ऐकिवात नाही. आता तर त्यांच्या घराच्या सभोवतालच भरदिवसा गोळीबार, खुनाच्या घटना घडू लागल्या आहेत. या स्थितीत त्यांनी अधिक कठोर व कणखर भूमिका घेणे अपेक्षित असताना त्यांचेच सरकार आयुक्ताची मानहानी होऊ नये म्हणून आणखी काही दिवस कळ काढा, त्यांना लवकरच बदलले जाईल, अशी भूमिका घेताना दिसते आहे. पूर्णपणे अपयशी ठरलेल्या या पोलीस प्रमुखाला एवढे सांभाळून घेण्यामागचे कारण काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

नवे आयुक्त कोण?
शहराचे नवे आयुक्त म्हणून रश्मी शुक्ला, व्ही.डी. मिश्रा व भूषणकुमार उपाध्याय यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी उपाध्याय यांनी येथे येण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून महालच्या वाडय़ातून त्यांना हिरवी झेंडी मिळाली असल्याची चर्चा सध्या दलात आहे.