रेडझोनसह पिंपरी पालिकेच्या संरक्षण खात्याशी संबंधित विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्टोनी व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. संरक्षण खाते व महापालिकेतील जागांची हद्द व मालकीचा तिढा वर्षांनुवर्षे कायम असल्याने नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे दिल्लीतील या बैठकीतील निर्णयांकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
मागील काही वर्षांपासून संरक्षण खात्याशी संबंधित प्रश्न मार्गी लागत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी िपपरीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ही हतबलता नुकतीच व्यक्त केली होती. आपण खासदार होतो, तेव्हापासून हे प्रश्न आपल्यासमोर येत आहेत. त्यानंतर अनेक जण खासदार झाले व संरक्षणमंत्रीही बदलत गेले. मात्र, ते प्रश्न कायम आहेत.
लष्कराकडून अचानक रस्ते बंद केले जात असल्यामुळे नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर, महापौर मोहिनी लांडे व पक्षनेत्या मंगला कदम यांनी शरद पवार यांची भेट घेतली व या प्रश्नांची नव्याने माहिती त्यांना दिली. तेव्हा पवार यांनी संरक्षणमंत्र्यांसावेत बैठक लावण्याची ग्वाही त्यांना दिली होती. त्यानुसार होणाऱ्या या बैठकीस महापौर व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पालिकेने संरक्षण खात्याला रस्त्यांच्या जागांसाठी आतापर्यंत ९० कोटी दिले असून आणखी ६८ कोटी द्यायचे आहेत. केवळ कागदी घोडे नाचवून वेळकाढूपणा केला जातो म्हणूनच हा प्रश्न सुटत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या बैठकीत याविषयी सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे सांगण्यात येते.