व्हीएनआयटीच्या एका विद्यार्थ्यांने वसतिगृहात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नसले तरी तीन विषयांचे पेपर चांगले गेले नव्हते, अशी पोलिसांची माहिती आहे. या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ‘व्हीएनआयटी’त गेल्या दोन महिन्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची ही दुसरी घटना आहे.
ऋषिकेश दीपक सरवटे हे मरण पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो ‘व्हीएनआयटी’त मेकॅनिकल इंजिनिअरिंगला तृतीय वर्षांला शिकत होता. या परिसरातील वसतिगृहात तिसऱ्या क्रमांकाच्या इमारतीमधील ४१ क्रमांकाच्या खोलीत तो रहात होता. मूळचा रायगड जिल्ह्य़ातील रोहा गावात तो रहाणारा आहे. नेहमीप्रमाणे तो आज सकाळी फिरायला न गेल्यामुळे त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांना शंका आली. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास विद्यार्थी बघायला गेले. त्यांनी दार ठोठावले, मात्र आतून प्रतिसाद न आल्याने मागील बाजूस जाऊन खिडकीतून पाहिले असता त्यांना आतील दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने सुरक्षा अधिकाऱ्यांनी कळविले. ते लगेचच तेथे आले. त्यांनी ऋषिकेशच्या खोलीचा दार महत्प्रयासाने उघडले. खोलीतील छताच्या पंख्याच्या हुकला त्याचा मृतदेह लोंबकळत होता. नॉयलॉन दोरीने त्याने गळफास घेतलेला दिसला. त्याच्या तोंडात रुमाल कोंबलेला होता. त्याला लगेचच खाली काढण्यात आले.
तोपर्यंत अंबाझरी पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी त्या खोलीची झडती घेतली. तीन पानी पत्र त्यांना सापडले. त्यातील अक्षरे ऋषिकेशचे असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली.
सध्या परीक्षा सुरू असून तीन पेपर झाले होते. तीन पेपर शिल्लक होते. काल तो इतर विद्यार्थ्यांसह चित्रपट पाहण्यास गेला होता, मात्र तो कुणाजवळ काही बोलला नव्हता. आज                  सकाळी ऋषिकेशच्या आत्महत्येच्या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली. वसतिगृहासमोर विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. संस्थेचे इतर प्राध्यापक व कर्मचारीही आले. पोलिसांनी ऋषिकेशच्या आत्महत्येप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
‘व्हीएनआयटी’त गेल्या दोन महिन्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. सातव्या क्रमांकाच्या वसतिगृहात राहणाऱ्या साईराजा या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली होती. आज सकाळी त्या परिसरात हीच चर्चा सुरू होती आणि त्याबद्दल चिंताही व्यक्त केली जात होती. ऋषिकेशने सुसाईड नोटमध्ये प्रारंभी आई-वडिलांची माफी मागितली आहे. पेपर चांगले गेले नसून अनुत्तीर्ण होण्याची भीती व्यक्त केली होती, असे पोलिसांनी सांगितले. ऋषिकेशच्या वडिलांना पोलिसांनी ही घटना कळविली असून ते नागपूरला येण्यास निघाले आहेत.