निवृत्तीनंतर सात-आठ वर्षांचा कालावधी झाल्यानंतरही हक्काचे पैसे परत मिळत नसल्याने प्राथमिक शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत असून प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
प्राथमिक शिक्षकांची पतसंस्था सध्या आचार्य दोंदेभवन येथे कार्यरत आहे. पूर्वीच्या सहकारी बँकेपेक्षाही यांचा कारभार अधिकच वादग्रस्त आहे. याच संस्थेवर काही काळ शासकीय प्रशासक नेमण्यात आले होते. त्यानंतर कारभारी मंडळ आले. कार्यकारी मंडळ योग्य पध्दतीने कारभार करून सभासदांना दिलासा देईल अशी अपेक्षा असताना त्यांनीही कोणत्याच अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. अनेक शिक्षक, शिक्षिका सेवानिवृत्त होऊन सात ते आठ वर्षांचा कालावधी झाला असला तरी त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम अद्यापही परत मिळालेली नाही.
या पतसंस्थेकडून कर्ज तर दिले जाते. परंतु ज्यांचे पैसे पतसंस्थेकडे आहेत त्यांचे पैसे मात्र परत करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही सेवानिवृत्त सभासदांनी केला आ्रहे. काही सेवानिवृत्तांना तर त्यांच्या मृत्यूनंतर पैसे परत करण्यात आल्याचेही प्रकार घडले आहेत. अशा मृत सेवानिवृत्तांच्या वारसांची त्यानंतरच्या कायदेशीर बाबी पूर्ण करता करता पुरेवाट होते.
आपले पैसे कधी मिळतील याची चौकशी करण्यासाठी बाहेरगावहून येणाऱ्यांना भाडे खर्च होऊनही कोणतीच माहिती मिळत नाही. अजी केल्यास त्याचे उत्तरही दिले जात नाही.
या परिस्थितीमुळे वैतागलेल्या काही सेवानिवृत्तांनी सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असता अधिकाऱ्यांनी या संस्थेच्या सर्वागीण चौकशीचे आश्वासन दिले.