रात्री-अपरात्री आरोग्यविषयक एखादी समस्या निर्माण झाल्यास आणि तात्काळ डॉक्टरांकडे जाणे शक्य नसेल तर दूरध्वनीद्वारे आजारावरील तातडीने कोणता इलाज करावा, याची माहिती डॉक्टरांकडून घ्यावी लागते. अशा वेळी जवळच्या डॉक्टरांचा दूरध्वनी क्रमांक नसेल तर मात्र मोठी गैरसोय होऊ शकते. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन गौरव बोर्डे या मुंबईकर तरुणाने एका अ‍ॅपची निर्मिती केली असून त्या माध्यमातून डॉक्टरांशी तात्काळ संपर्क साधणे आता गरजूंना शक्य होणार आहे. पुण्यातील रंगूनवाला महाविद्यालयात दंतचिकित्सा विभागात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गौरवने ‘डेन्ट टाइम्स’ नावाचे अ‍ॅप तयार केले आहे. यामध्ये वेगवेगळ्या आजारांवर उपचार करणारे निष्णात डॉक्टर तसेच वैद्यकीय क्षेत्रातील घडामोडी, नोकरीच्या संधी, नव्या औषधांची निर्मिती अशी इत्थंभूत माहिती संकलित करण्यात आली आहे.
मुंबईतील मालाडमध्ये लहानाचा मोठा झालेल्या गौरव बोर्डे याने कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील एसजेएम डेंटल महाविद्यालयातून दंतचिकित्सेचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. महाविद्यालयात असताना त्याने तेथील बातम्या देणारे वर्तमानपत्र सुरू केले होते. शिक्षण संपल्यानंतर विद्यालयातील विद्यार्थी विविध ठिकाणी कार्यरत झाले आणि त्यांच्याशी असलेला संपर्क तुटू लागला. दंतचिकित्सा क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व मित्रांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रातील माहिती देण्यासाठी आपल्या महाविद्यालयातील वर्तमानपत्राचे अ‍ॅप सुरू करण्याचा निर्णय गौरवने घेतला. अभियांत्रिकी विषयातील कोणतेही ज्ञान गौरवला नाही. तरीही केवळ गुगलवरील अ‍ॅप निर्मितीच्या माहितीच्या आधारे त्याने हे मेडिकल अ‍ॅप सुरू केले. ‘डेन्ट टाइम्स’ या नावाची नोंदणी करून कायदेशीर बाबी पूर्ण करून त्याने सर्वासाठी हा अ‍ॅप उपलब्ध करून दिला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून दंतचिकित्सेच्या क्षेत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, या क्षेत्रातील नोकरीच्या संधी, दंतचिकित्सेविषयीचे विविध कार्यक्रम आणि त्याची माहिती या अ‍ॅपमधून मिळत आहे.
ऑनलाइन चॅटच्या माध्यमातून इलाज..
अ‍ॅपच्या मदत विभागामध्ये संपर्कातील डॉक्टरांशी रात्री-अपरात्री ऑनलाइन चॅटची सुविधा या अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध आहे. या माध्यमातून रात्रीच्या वेळी आरोग्यविषयक निर्माण होणाऱ्या अडचणीवर तात्काळ मदत मिळवण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या या अ‍ॅपवर दंतविषयक डॉक्टर उपलब्ध असून इतरही डॉक्टरांची मदत उपलब्ध करून घेण्यासाठी गौरव बोर्डे प्रयत्न करत आहे. आयुर्वेदाबरोबरच वैद्यकीय विभागाच्या विविध विभागांची माहितीही या अ‍ॅपच्या माध्यमातून भविष्यात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा गौरवचा मानस आहे. दंतचिकित्सा क्षेत्रातील कार्यरत असलेल्या तरुणांना तसेच सामान्य नागरिकांना दातांच्या समस्येवर उपयुक्त ठरेल अशी माहिती या अ‍ॅपवरून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याने सांगितले. सध्या प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेला हा अ‍ॅप देशभरातील १३ हजार जणांनी डाउनलोड करून घेतला असल्याची माहिती गौरव बोर्डे याने दिली.