07 August 2020

News Flash

किस्मत कनेक्शन

‘दबंग’मध्ये ती ज्या अवतारात आणि रूपात प्रकटली तिचं नशीबच पालटलं. पहिल्याच चित्रपटात ती सलमानबरोबर उभी राहिली आणि तिने जिंकून घेतलं.

| November 17, 2013 01:07 am

‘दबंग’मध्ये ती ज्या अवतारात आणि रूपात प्रकटली तिचं नशीबच पालटलं. पहिल्याच चित्रपटात ती सलमानबरोबर उभी राहिली आणि तिने जिंकून घेतलं. आत्तापर्यंत अगदी देशी तोंडवळा असलेली नायिका म्हणून एकमेव विद्या बालनकडे आशेने पाहिलं जायचं. ‘दबंग’मध्ये पहिल्याच डावात सलमान खानला खामोश. करणाऱ्या राजोला पाहताच बॉलीवूडला आपली दुसरी देशी नायिका मिळाली ती म्हणजे सोनाक्षी सिन्हा. त्यामुळे तिला कधीच मागे वळून पाहावं लागलं नाही. या वर्षभरात सोनाक्षीचे तीन चित्रपट प्रदर्शित झालेत आणि दोन बिग बजेट चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित होणार आहेत. बॉलीवूडमध्ये येण्यापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास हे आपल्यासाठी एक प्रकारे  ‘किस्मत’ कनेक्शन आहे असं सोनाक्षी मानते..
इथे येणं ही माझी नियतीच होती. नाही तर फिल्मी वातावरणात लहानाची मोठी झालेल्या मला ना कधी चित्रपटांचं आकर्षण वाटलं होतं, ना अभिनेत्री वगैरे बनण्याचा विचार मनाला शिवला होता..
फॅशन डिझायनिंगचा अभ्यास करत होते. पुढे काय करायचंय किंवा काही ठरलेलं नव्हतं. मस्त खाणंपिणं आणि जो विषय घेतला आहे तो पूर्ण करायचा. बाकी सगळी मजामस्ती असं आनंदात सुरू होतं. जेव्हा मी माझं वजन कमी केलं तेव्हा कुठे सलमान आणि अरबाझ खानने मला ‘दबंग’च्या भूमिकेसाठी विचारणा केली. चित्रपटाची कथा इतकी सुंदर होती की, मी काय माझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी ती भूमिका नाकारली नसती. बाबांकडून परवानगीचीही अडचण नव्हती. एक तर मी त्यांची इतकी लाडकी आहे, की मी जे करेन ते त्यांना मान्य असतं. दुसरं म्हणजे खान कुटुंबीयांना ते इतकी र्वष ओळखतात, की त्यांच्याबरोबर काम करतेय म्हटल्यावर उलट आनंदीआनंदच होता. त्यामुळे नशिबाने आलेली ती संधी मी घेतली आणि बाकीचा सारा इतिहास तुम्हाला माहितीच आहे.. सोनाक्षी उत्साहाने भरभरून सांगत असते.
तुझा चेहरा तू बऱ्यापैकी गंभीर आणि विचारी असल्यासारखा वाटतो, पण तुझे चित्रपट पाहिले तर एकमेव ‘लुटेरा’ वगळता सगळे चित्रपट ‘राऊडी राठोड’, ‘सन ऑफ सरदार’, ‘बॉस’, ‘रॅम्बो राजकुमार’ एकेक भयानक नावांचे आणि तद्दन मसाला एंटरटेन्मेंट करणारे आहेत, असं सांगताच ती खूश होते. मला स्वत:ला असेच चित्रपट खूप आवडतात. एक अभिनेत्री म्हणून मी सगळ्या प्रकारचे, शैलीतले चित्रपट करायला पाहिजेत. ‘दबंग’ आणि ‘राऊडी राठोड’सारखे चित्रपट केल्यानंतर सोनाक्षी फक्त अशाच भूमिका करू शकते, असं मला आडून आडून हिणवलं जायचं. मग विक्रमादित्यने ‘लुटेरा’ करण्याची संधी दिली. एखाद्या कादंबरीसारखा तो चित्रपट होता. ‘लुटेरा’तलं माझं काम लोकांना आवडलं आणि समीक्षकांनाही आवडलं, त्यामुळे इतरांची तोंडं बंद झाली, पण म्हणून माझ्यातलं अभिनयाचं सामथ्र्य सिद्ध करण्यासाठी मी तसेच चित्रपट करत राहिलं पाहिजे असा नियम नाही ना.. सोनाक्षी सांगते. ‘लुटेरा’ चित्रपटामुळे एक अभिनेत्री म्हणून माझ्या कामाचा दर्जा फारच उच्च स्तरावर नोंदला गेला आहे. त्यामुळे पुन्हा तितक्याच ताकदीचा किंवा त्याहीपेक्षा चांगले कथानक आणि चांगल्या दिग्दर्शकाचा चित्रपट असेल तरच तो मी करेन. तो आता माझ्या निवडीचा, माझ्या विचारांचा भाग झाला आहे. इतर वेळेला कथानक आवडलं की मी चित्रपटासाठी होकार देते आणि माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका. मी मुळात एकदम खुशालचेंडू आणि खेळकर वृत्तीची आहे. मला नाच-गाणी करणं, पार्टी करणं, अ‍ॅक्शन दृश्ये करणं, मग ते नायक-नायिकेचं प्रेम-विरह या सगळ्या गोष्टी करायला फार मजा वाटते. त्यामुळे मला जे आवडतं ते मी करते. म्हणजे ‘आर. राजकुमार’चेच उदाहरण घे ना.. असं म्हणत गाडी तिच्या आत्ताच्या चित्रपटांवर येते.
‘आर. राजकुमार’मध्ये मी एकदम राऊडी मुलीची भूमिका केली आहे. चित्रपटाचा नायक सतत तिचा पिच्छा करत असतो. त्याला ती वैतागलेली असते, पण त्याला धडा शिकवण्याच्या नादात ती स्वत:च प्रेमात पडते आणि उत्तरार्धात मग प्रेमासाठी वाट्टेल ते करणारी, मग हातात दांडपट्टा घेऊन मारामारी करणारी, काचेच्या बाटल्या फोडून दरारा निर्माण करणारी अशी तरुणी मी साकारली आहे. मला खरं म्हणजे प्रभुसरांचे चित्रपट खूप आवडतात. अगदी ‘वाँटेड’पासून ते त्यांच्या आत्तापर्यंतच्या ‘रमैय्या वस्तावैय्या’पर्यंत प्रत्येक चित्रपट मी आवडीने पाहत बसते. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी असा चित्रपट करावा ही माझी इच्छा होती. आणि ‘राऊडी राठोड’चे चित्रीकरण सुरू असतानाच त्यांनी मला ‘आर. राजकुमार’ची कथा ऐकवली. बस्स्! दुसऱ्याच क्षणाला मी हो म्हणून मोकळी झाले..
‘आर. राजकुमार’मध्ये शाहिद कपूर तिचा नायक आहे. शाहिदबरोबर काम करताना खूप मजा आली, असं ती सांगते. शाहिदला याआधी मी फार ओळखत नव्हते. म्हणजे अ‍ॅवॉर्ड फंक्शनमधून किंवा पाटर्य़ामधून नमस्कार-चमत्कार करण्यापलीकडे आमची ओळख पोहोचली नव्हती, पण तो खूपच चांगला अभिनेता आहे हे पहिल्याच दिवशी मला लक्षात आलं. सहज अभिनय ही त्याची खासियत आहे. उलट माझीच भीतीने गाळण उडाली होती, कारण प्रभुसरांचा चित्रपट म्हणजे त्यातलं प्रत्येक गाणं, प्रत्येक अ‍ॅक्शन अगदी छान बसवलेलं असणार. एकीकडे प्रभुदेवा आणि दुसरीकडे शाहिदसारखा उत्तम डान्सर.. मधल्यामध्ये माझं काय होणार? हीच चिंता सतावत होती. आम्ही पहिलं गाणं के लं ते ‘साडी के फॉल सा..’. चित्रीकरण संपलं आणि आम्ही सगळे विश्रांतीसाठी बसलो होतो. माझ्या मनात घालमेल सुरूच होती. त्या वेळी सेटवर छायाचित्रकारालाही बोलावलं होतं. मी लगेच लॅपटॉपवर आमच्या नृत्याची छायाचित्रे बघितली. शाहिद आणि माझी प्रत्येक स्टेप तंतोतंत जुळली होती हे बघितल्यावर माझा जीव भांडय़ात पडला.. आता मी आरामात सगळे डान्स करू शकते. अजब आत्मविश्वास मिळाला होता. सोनाक्षीचा हा आत्मविश्वासच तिच्या यशाला कारणीभूत आहे, कारण त्यामुळेच तर जे आपल्या मनाला पटतं ते करायला ती अजिबात मागेपुढे पाहत नाही. ज्या सहजतेने ती शाहिद आणि प्रभुदेवाबरोबर ताल जुळवून घेते त्याच सहजतेने ती तिग्मांशू धुलियाचा ‘बुलेट राजा’सारखा चित्रपटही करते.
तिग्मांशूचा ‘पानसिंग तोमर’ मी पाहिला होता. तो दिग्दर्शक म्हणून ज्या प्रकारचे चित्रपट करतो ते मला आवडतात, पण म्हणून मी ‘बुलेट राजा’ करेनच असे नाही. खरे तर, ते माझ्या मूळ स्वभावाशी जुळणारे चित्रपटच नाहीत. तरीही त्याने माझ्याकडून तो चित्रपट करून घेतला आहे. सैफ अली खान आणि तिग्मांशू धुलिया या दोघांबरोबर काम क रणं.. ‘बुलेट राजा’ हाही माझ्यासाठी फार वेगळा चित्रपट ठरला आहे आणि प्रभुदेवाचा ‘आर. राजकुमार’ही. दोन्ही चित्रपटांत अ‍ॅक्शन आहे, नायिकेसाठीही अ‍ॅक्शन दृश्ये आहेत आणि ती अगदी खरी वाटावीत म्हणजे प्रभुदेवाने तर या चित्रपटासाठी आपली नेहमीची अ‍ॅक्शन शैलीही बदलली आहे. कुठलेही केबल्स-वायर्स नाहीत. अगदी एकमेकांना धरून आपटणे अशी कुठेही घडणारी मारामारी असेल ती या चित्रपटात आहे, त्यामुळे दोन्ही चित्रपटांचा अनुभव माझ्यासाठी फार वेगळा होता, असे सोनाक्षीने सांगितले.
बाबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. चित्रपटात यायला त्यांची ना नव्हतीच, पण ‘दबंग’नंतर जे मला यश मिळालं ते पाहून त्यांना आनंद झाला. चित्रपटसृष्टीत येणं हे माझं भाग्य होतं. मला यशही तितकंच सहज मिळालं याचाही त्यांना आनंद वाटला, पण त्यानंतर जे मी कमावलं ते त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. आज मी जे चित्रपट करते, मग त्यात ‘बॉस’ही आहे आणि ‘लुटेरा’ही आहे. एक अभिनेत्री आणि व्यक्ती म्हणून माझा जो वावर आहे, मी जे बोलते, मग ते माझ्या फिगरबद्दल असेल, कपडय़ांबद्दल असेल, चित्रपटातील इंटिमेट दृश्यांबद्दल असेल, या सगळ्यांबाबत जो एक विचार आणि माझं आग्रही मत घेऊन मी चित्रपट निवडते आणि तरीही आजच्या घडीला मी माझे यश टिकवून ठेवले आहे हे पाहिल्यानंतर बाबांच्या आनंदाचे अभिमानात रूपांतर झाले आहे. मी त्यांची मुलगी आहे याचा त्यांना खूप अभिमान वाटतो आणि माझ्यासाठी त्यांचा तो अभिमान जपणं फार महत्त्वाचं आहे, हे सांगताना सोनाक्षी अजिबात हळवी होत नाही. तेव्हा वरवर खेळकर वाटणाऱ्या सोनाक्षीच्या मनातच कुठे तरी समजूतदारपणाचं, सहजस्वभावाचं अजब रसायन असणार असं वाटतं. या सहजपणानेच तिने बॉलीवूडला अगदी खामोश..पणे जिंकून घेतलं आहे.
जेव्हा मी माझं वजन कमी केलं तेव्हा कुठे सलमान आणि अरबाझ खानने मला ‘दबंग’च्या भूमिकेसाठी विचारणा केली. बाबांकडून परवानगीचीही अडचण नव्हती. एक तर मी त्यांची इतकी लाडकी आहे, की मी जे करेन ते त्यांना मान्य असतं. दुसरं म्हणजे खान कुटुंबीयांना ते इतकी र्वष ओळखतात, की त्यांच्याबरोबर काम करतेय म्हटल्यावर उलट आनंदीआनंदच होता. त्यामुळे नशिबाने आलेली ती संधी मी घेतली आणि बाकीचा सारा इतिहास तुम्हाला माहितीच आहे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2013 1:07 am

Web Title: sonakshi sinha says she has connection with fate
Next Stories
1 वैश्विक कथानकामुळेच ऑस्करवारी
2 होमी अदजानिया सांगणार फॅनीची कथा
3 प्रेमाच्या भडक लीला
Just Now!
X