येथील खते परराज्यात नेण्यास बंदी असताना २१ टन खत गुजरातेत बेकायदेशीरपणे वाहून नेणाऱ्या मालमोटार चालकाला पोलिसांनी अटक केली. सूरत-नागपूर वळण रस्त्यावरील टोल नाक्याजवळच संशयास्पद मालमोटारीची तपासणी झाली. यावेळी पोलिसांनी खतांच्या मालमोटारीसह २३ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
महाराष्ट्रातून गुजरातकडे खते नेऊन विक्री करण्यास बंदी असताना एका मालमोटारीतून २१ टन खते वाहून नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही मालमोटार नागपूर-सूरत महामार्गावर पोहोचताच सोमवारी रात्री वळणरस्त्यावरील टोल नाक्यावर अडविण्यात आली. मालमोटारीतील मालाची तपासणी केली असता महाधन, पोटॅश (एमओपी-आयपीएल) कंपनीच्या ४५० गोण्या आढळल्या. प्रतिगोणी ५० किलो असलेले २१ टन खत पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कृषी अधिकारी ए. जी. नागरे यांना ही माहिती देण्यात आली. या प्रकरणी मालमोटारचालक राजेश रामराव पाटील याला ताब्यात घेण्यात आले. जळगाव जिल्ह्यातून ही मालमोटार गुजरातकडे निघाली होती.