सोलापूर जिल्हय़ातील पाण्याच्या प्रश्नावर उजनी धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत आझाद मैदानावर प्रभाकर देशमुख यांनी चालविलेल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अश्लील भाषेत हेटाळणी झालेल्या आंदोलनास समर्थन देण्यासाठी देशमुख यांच्या मोहोळ तालुक्यातील पाटकूल गावात गुरुवारी गुढीपाडव्याचा सण साजरा झाला नाही. गावात चूलही पेटली नाही. जोपर्यंत उजनी धरणाच्या दोन्ही कालव्यांतून पाणी सोडेले जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार गावकऱ्यांनी बोलून दाखविला.
सुमारे सहा हजार लोकसंख्या व सुमारे पाचशे घरे असलेल्या मोहोळ तालुक्यातील पाटकूल हे आंदोलनकर्ते प्रभाकर देशमुख यांचे गाव. या गावासह आसपासची गावे उजनी धरणाच्या कालव्यावर अवलंबून आहेत. परंतु धरणाच्या दोन्ही कालव्यांतून जुलै २०१२पासून पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती अधिक भीषण होत आहे. या पाश्र्वभूमीवर धरणाच्या दोन्ही कालव्यांतून पाणी सोडावे म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून प्रभाकर देशमुख हे सोलापूर जिल्हा जनसेवा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत. परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही. उलट, एवढे दिवस आंदोलन करून काय उपयोग? पाणी मिळाले का? असा सवाल उपस्थित करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अश्लील व असभ्य भाषेत देशमुख यांच्या आंदोलनाची हेटाळणी केल्याने राज्यात सर्वत्र पवार यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. यातच मोहोळ तालुक्यातील भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शंकरराव साठे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल सुनावत उजनी धरणात पुणे जिल्हय़ातून २४ तासांत पाणी सोडण्याचा आदेश दिला. त्यामुळे अजित पवार यांना आणखी चपराक बसली.
या पाश्र्वभूमीवर मुंबईत प्रभाकर देशमुख यांना चालविलेले आंदोलन लक्षवेधी ठरले असून, या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी पाटकूल गावकऱ्यांनी एकाही घरावर गुढी न उभारता एकजूट दाखवत गुढीपाडव्याचा सण साजरा केला नाही. एवढेच नव्हेतर गावात कोठेही चूल पेटली नाही. यासंदर्भात गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत. शासनाने उजनी धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाणार आहे. गावात एक दिवस नव्हेतर आठ दिवस चूल पेटणार नाही. शालेय उन्हाळी सुटी लागल्याने गावातील सर्व मुलांसह मुक्या जनावरांना मुंबईत नेऊन देशमुख यांच्या आंदोलनात उतरण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे हे गुरुवारी गुढीपाडव्याला पाटकूल येथे चारा छावणीचा शुभारंभ करण्यासाठी येणार होते. परंतु पाण्याच्या प्रश्नावर गावकऱ्यांच्या सामोरे जावे लागणार म्हणून पालकमंत्र्यांनी आपली पाटकूलची भेट रद्द केल्याचे सांगण्यात आले.