‘सारेगमप’ या झी मराठीवरील गाजलेल्या रिअ‍ॅलिटी शोचे नवे पर्व सुरू होत आहे. ‘तरूण गायकांचे तरूण गाणे’ अशा संकल्पनेवर आधारित या पर्वाचे परीक्षण ‘सारेगमप’च्या लाडक्या अवधूत दादाबरोबर जगप्रसिध्द तालवादक तौफिक कुरेशी करणार आहेत. याआधी तौफिक कुरेशी यांनी ‘सारेगमप’मध्ये पाहुणे परीक्षक म्हणून हजेरी लावली होती. पण, संगीतात विविध प्रयोग करू पाहणारा त्यांच्यासारखा अवलिया पहिल्यांदाच पूर्णवेळ मराठी रिअ‍ॅलिटी शोचे परीक्षक म्हणून काम पाहणार आहे.
दिग्दर्शक आणि संगीतकार दोन्ही भूमिकांमध्ये सातत्याने नवनवीन काही करत राहणारा म्हणून अवधूत गुप्ते हे तरूण नाव पहिल्या पर्वापासूनच आमच्याबरोबर जोडले गेले होते पण त्याच्याबरोबर कोण, याचा विचार करताना तौफिक कुरेशी याच नावावर आम्ही येऊन येऊन थांबलो असे झी मराठीचे व्यवसाय प्रमुख दीपक राजाध्यक्ष यांनी सांगितले.
 मला या शोचे पूर्णवेळ परीक्षक होण्याची इच्छा होतीच. पण, योग्य वेळी आणि योग्य पर्वासाठी आपल्याला ही संधी दिली गेली आहे, अशा शब्दांत तौफिक कुरेशींनी आपला आनंद व्यक्त केला आहे. अवधूत आणि तौफिक कुरेशी यांच्या परीक्षणाखाली स्वरांचे हे आव्हान पेलण्यासाठी राज्यभरातील १० हजार स्पर्धकांमधून १४ सवरेत्कृष्ट स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. या शोच्या दिग्दर्शनाची धुरा संगीतकार राहुल रानडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.