News Flash

‘लेक टॅपिंग’च्या कामातही तांत्रिक घोळ..

पाणीटंचाईच्या काळात मोडकसागरमधील आणखी पाणी मुंबईकरांना उपलब्ध व्हावे यासाठी ‘लेक टॅपिंग’चा प्रयोग मुंबई महानगरपालिकेने यशस्वी केला खरा पण त्यातही पालिकेच्या अभियंत्यांनी

| September 6, 2014 12:32 pm

पाणीटंचाईच्या काळात मोडकसागरमधील आणखी पाणी मुंबईकरांना उपलब्ध व्हावे यासाठी ‘लेक टॅपिंग’चा प्रयोग मुंबई महानगरपालिकेने यशस्वी केला खरा पण त्यातही पालिकेच्या अभियंत्यांनी तांत्रिक घोळ घातला आणि राज्य सरकारच्या अभियंत्यांना तो निस्तरावा लागल्याचे समोर आले आहे. ‘लेक टॅपिंग’साठी विशिष्ट कोनात बोगदा खणणे आवश्यक असताना पालिकेच्या अभियंत्यांनी समांतर पद्धतीने बोगदा खणून ठेवला..अंतिम टप्प्यात जलसंपदा विभागाचे तज्ज्ञ आल्यावर त्यांच्या लक्षात हा घोळ आला..अशा बोगद्यातून ‘लेक टॅपिंग’ होणारच नाही हे लक्षात आल्यावर अक्षरश ‘यू टर्न’ पद्धतीने पुन्हा विशिष्ट कोनातून खालच्या बाजूला बोगदा खणण्यात आला आणि तो आवश्यक कोनातून पुन्हा धरणाच्या पृष्ठभागापर्यंत नेण्यात आला. पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अंगी मुरलेली उदासीनता ही अत्यंत कठीण प्रकल्पाचाही कसा बोऱ्या वाजवू शकते याचे प्रत्यंतर यानिमित्ताने आले आहे.
धरणातील पाणी जलबोगद्यांद्वारे मुख्य वाहिनीपर्यंत आणण्याचे काम अभियांत्रिकीदृष्टय़ा क्लिष्ट असते. भूगर्भात अनेक किलोमीटपर्यंत बोगदे तयार करण्यासाठी या प्रकल्पातील अभियंत्यांनी मेहनत घेतली. धरणातून १५६ मीटर व १४६ मीटर उंचीवरील बोगदा अभियंत्यांनी यापूर्वीच तयार केला. त्याच पद्धतीने त्यांनी १३६ मीटर उंचीवरही बोगदा खणण्याचे काम सुरू केले आणि तिथेच घोळ झाला. ‘लेक टॅपिंग’साठी विशिष्ट कोनातून बोगदा खणावा लागत असतो. त्याकडेच पालिकेच्या अभियंत्यांचे दुर्लक्ष झाले. अंतिम टप्प्यात ‘लेक टॅपिंग’च्या तांत्रिक मार्गदर्शनासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाचे प्रमुख दीपक मोडक यांना बोलावण्यात आले. तोवर आदान विहिरीपासून धरणापर्यंतचा १३६ मीटरचा बोगदा खणून झाला होता. केवळ ६० मीटर अंतरच शिल्लक होते. ‘लेक टॅपिंग’ करण्यासाठी धरणाच्या पृष्ठभागाला सरळ रेषेत छिद्र पाडता येत नाही. झालेला घोळ मोडक यांच्या लक्षात आला. ‘लेक टॅपिंग’ यशस्वी करायचे तर पुन्हा बोगदा खालच्या बाजूला वळवून पुन्हा वर आणण्याचा ‘उलटा घास’ घेणे अनिवार्य झाले होते. त्यामुळे १३६ मीटरवरून १२३ मीटपर्यंत खाली जाऊन पुन्हा १३६ मीटपर्यंत वर येणारा अक्षरश: ‘हेअरपीन’ अथवा ‘यू टर्न’ पद्धतीचा बोगदा खणण्याचा धोका पत्करण्यात आला. भूगर्भात, धरणाच्या पाण्याखाली असे काम करणे अत्यंत कठीण असते. त्याचप्रमाणे केवळ तीन मीटरचा व्यास असल्याने कोणत्याही मोठय़ा उपकरणाचाही वापर करता येत नव्हता. मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंत्यांनी कस लावून मेहनतीने बोगद्याचे काम अखेर यशस्वी केले.

का झाले लेक टॅपिंग?
मोडकसागरमधून पाणी बाहेर काढण्यासाठी यापूर्वीपासूनच एक यंत्रणा आहे. मात्र मध्य वैतरणामधील तसेच भविष्यात बांधल्या जाणाऱ्या गारगाई धरणातील पाणीही मोडकसागरमध्ये आणून येथून मुख्य जलवाहिनीकडे पोहोचवले जाणार आहे. नवीन यंत्रणेत मोडकसागर धरणातून १५६, १४६ व १३६ मीटरवरून प्रत्येकी तीन मीटर व्यासाच्या बोगद्यातून षटकोनी आकाराच्या विहिरीत पाणी आणण्याचे व विहिरीतून ते मोठय़ा बोगद्याद्वारे मुख्य जलवाहिनीपर्यंत नेण्यात येईल. धरणातील पाण्याचा दाब तसेच प्रवाह यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही विहीर बांधण्यात आली. धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा भोवरा होऊ नये यासाठी विहिरीचा आकार षटकोनी ठेवण्यात आला. विहिरीची प्रत्येक बाजू सात मीटरची असून खोली १०४ मीटरची आहे. ही विहीर व मुख्य बोगदा यांतून पाणी उपसण्यासाठी प्रति तास ३०० घनमीटर क्षमतेचे तीन पंप बसवण्यात आले आहेत. धरणाकडून येणाऱ्या तीन बोगद्यांमधील पाण्याचे नियंत्रण करण्यासाठी विहिरीत झडपाही बसवण्यात आल्या आहेत. १५६ मीटर व १४६ मीटर उंचीवरील तीन मीटर व्यासाचे बोगदे सरळ रेषेत खणण्यात आले आहेत. मार्च महिन्यात धरणातील पाण्याची पातळी कमी करून धरणाची पृष्ठभाग फोडण्यात आली व बोगदे पूर्ण झाले. १३६ मीटर उंचीवरील बोगद्यासाठी मात्र पाण्याची पातळी कमी करून उपयोग नसल्याने डायनामाइटच्या स्फोटाने धरणाच्या पृष्ठभागाचा तीन मीटर व्यासाचा भाग फोडावा लागला.

कोयना आणि मोडकसागरमधील फरक
कोयना धरणात केलेले लेक टॅपिंग खुल्या प्रकारचे होते. आदान विहिरीचे तोंड बंद करून तो पाण्याने पूर्ण भरला जातो. तसेच रॉक प्लगच्या- म्हणजे स्फोट करायच्या धरणाच्या मुखाजवळ हवेची उशी (एअर कुशन) ठेवण्यात येते. त्यामुळे स्फोट झाल्यावर निर्माण झालेला वायू आगाम विहिरीत न घुसता धरणाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर मुक्त होतो व त्यामुळे पाण्याचा फुगा तयार होतो. मोडकसागरमध्ये मात्र याच्या उलट पद्धत अवलंबण्यात आली. आदान विहिरीचे तोंड मोकळे ठेवण्यात आले व त्यात पाणीही भरले गेले नाही. ‘लेक टॅपिंग’साठी ९ कोटी रुपये खर्च झाला आहे.

‘लेक टॅपिंग’चा उपयोग
सध्या मोडकसागरमधून पाणी घेण्यासाठी शेवटचा बोगदा हा १४३ मीटरवर आहे. आता १३६ मीटर धरणातील आणखी चार मीटर खोलीचे, अंदाजे ३० हजार दशलक्ष लिटर (संपूर्ण शहराला नऊ दिवस पुरेल एवढे) पाणी वापरता येईल. दुष्काळसदृश्य स्थितीत या पाण्याचे मोल अधिक असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 12:32 pm

Web Title: technical jumble in lake tapping work
Next Stories
1 नाही आवाजा तोटा!
2 वातानुकुलित डबलडेकर आता पुणे किंवा नाशिकला?
3 मुंबईतील गंभीर अपघातांत घट
Just Now!
X