News Flash

मलखांबला मान्यतेसाठी प्रयत्न- सुसरे

महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल खेळ असलेल्या मलखांबाच्या राज्य संघटनेत तब्बल २८ वर्षांनी परिवर्तन घडले व संघटनेचे नेतृत्व नगरच्या प्रताप सुसरे यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाकडे खेचून

| April 3, 2013 01:02 am

 महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल खेळ असलेल्या मलखांबाच्या राज्य संघटनेत तब्बल २८ वर्षांनी परिवर्तन घडले व संघटनेचे नेतृत्व नगरच्या प्रताप सुसरे यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाकडे खेचून आणले. त्यासाठी राज्यभर फिरुन संघटनेची नव्याने बांधणी केली. संघटनेवर इतकी वर्षे वर्चस्व होते ते केवळ मुंबई, पुणे आणि सातारा या तीन जिल्ह्य़ांचे. वर्धा येथे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संघटनेतील अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का स्वीकारावा लागला. सुसरे यांच्या मते संघटनेच्या कार्यपद्धतीत अनेक उणिवा होत्या व त्याचा परिणाम खेळाडू व खेळावर होत होता. या उणिवा दूर करण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्य़ास प्रतिनिधित्व दिले गेले आहे. राज्यात मलखांब खेळ, त्याचा स्पर्धात्मक दर्जा वाढवण्यासाठी कोणते उपक्रम हाती घेतले जाणार, याविषयी राज्य हौशी मलखांब संघटनेचे मानद सचिव प्रताप सुसरे यांनी ‘लोकसत्ता’शी केलेली बातचीत.
राज्य संघटनेची निवडणूक लढवण्याचे कारण?
-गेल्या काही वर्षांत मलखांब खेळाच्या क्षेत्रात काम करताना संघटनेच्या कार्यपद्धतीविषयी अनेक उणिवा जाणवल्या. सरावाच्या दृष्टीने ज्या जिल्हा संघटना कमकुवत होत्या, त्यांच्यामध्ये नैराश्य वाढताना दिसत होते, महाराष्ट्राचा हा खेळ ग्रामीण भागातून लुप्त होतो काय, अशी भिती होती. यासाठी कमकुवत संघटनांचे राज्यभरातील कार्यकर्ते एकत्र आले व त्यांनी नेतृत्व करण्याची विनंती केली, ती मी मान्य केली.
मूळ महाराष्ट्रातील हा खेळ समजला जातो, काय परिस्थिती आहे राज्यात?
– राज्यातील २८ जिल्ह्य़ात संघटना कार्यरत आहेत, राष्ट्रीय स्पर्धेतून किमान १८-१९ राज्य संघ सहभागी होत असतात. राज्यात मोजक्याच जिल्हा संघटनांचे वर्चस्व, मार्गदर्शनाचा अभाव, आर्थिक अडचणी, स्पर्धात्मक दर्जा व प्रशिक्षण शिबिरांचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील संघटना, खेळाडू पुढे येत नव्हते. काही ठराविक जिल्ह्य़ातील खेळाडू स्पर्धेत आघाडीवर रहात. प्रत्येक जिल्ह्याला भेटी देताना केलेल्या अभ्यासात सद्यस्थिती जाणवली, त्यांच्या अडचणी, विचार समजून घेतले. खेळाचा स्पर्धात्मक दर्जा वाढवण्यासाठी कार्यक्रम ठेवला, तो सर्वाना आवडला. त्यामुळे संघटनेची बांधणी करता आली व त्यातूनच परिवर्तन घडले. नगर जिल्ह्य़ात शाळा व जिल्हा संघटनेची सराव केंद्रे अशा एकूण २२ ठिकाणी प्रशिक्षण चालते. महाराष्ट्र मंडळ (पुणे), हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (अमरावती), पवनपुत्र व्यायाम मंदिर व समर्थ व्यायाम मंडळ (मुंबई) येथे पुर्वीपासून प्रशिक्षण केंद्रे आहेत. कै. रमेश दामले, उदय देशपांडे यांनी अंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार व प्रसाराचे काम केले.
सध्याच्या जमान्यात मल्लखांब खेळाला महत्व किती?
-कमी पैशात, कमी जागेत, कमी वेळेत सर्वागाला व्यायाम देणारा हा क्रीडा प्रकार आहे. प्राचीन खेळाला पेशवेकाळात त्यांचे अंगरक्षक गुरुवर्य बाळंभट्टदादा देवधर यांनी तो पुनर्जीवित केला. सध्या मलखांब खेळावर जिन्मॅस्टीक, योगा यांचाही प्रभाव पडला आहे. तो चांगला असला तरी मल्लखांब खेळाचा मुळ गाभा न बदलता स्वीकारायला हवा. मुळ उद्देश मलखांब लोप पावू नये हाच आहे. मुलांसाठी पुरलेला मल्लखांब, टांगता मल्लखांब, रोप मलखांब असे तर मुलींसाठी रोप मल्लखांब असे क्रीडा प्रकार आहेत. याशिवाय ऊसाचा, बाटलीवरील असे प्रदर्शनीय प्रकारही आहेत.
खेळाला चालना देण्यासाठी, प्रसार व प्रचारासाठी काय करणार?
-प्रत्येक जिल्हास्तरावर विद्यार्थी, प्रशिक्षक व पंच यांच्यासाठी शिबिरे आयोजित करुन स्पर्धात्मक दर्जा व सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. रायगड, जालना, गडचिरोली, गोंदिया, भंडारा अशा काही जिल्ह्य़ात संघटना नोंदणीकृत नाही. तेथे त्या केल्या जातील. कारणे शोधून प्रत्येक जिल्हा संघटना कार्यरत केली जाईल. सर्व जिल्हा शाखांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढवला जाईल. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या स्थायी मान्यतेसाठी निकषांना पात्र होण्याचा प्रयत्न आहे. योजनांची माहिती होण्यासाठी व प्रस्ताव क्रीडा परिषद, क्रीडा संचलनालयाकडे पाठवण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. निमंत्रित ग्रामीण स्पर्धाच्या आयोजनावर भर राहील. शासकीय ग्रामीण स्पर्धा (पायका) सुरु करण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय स्पर्धात पूर्वी सातत्य नव्हते. दोन वर्षांपासून त्या होत आहेत, त्यात पुढील काळात सातत्य ठेवले जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 1:02 am

Web Title: try to recognize gymnastics susare
Next Stories
1 ज्योती पतसंस्थेकडे ८३ कोटींच्या ठेवी
2 डबिंग तंत्रज्ञानाची नगरला कार्यशाळा
3 कोल्हापुरात व्यापार बंदला मोठा प्रतिसाद
Just Now!
X