‘फोर्स’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटात आलेला विद्युत जमवाल हा अभिनेता अ‍ॅक्शन हीरो म्हणून नावाजला जातोय. अमेरिकन अभिनेता ऑर्नाल्ड श्वात्झर्नेगरच्या गाजलेल्या ‘कमांडो’ या चित्रपटातून प्रेरणा घेऊन हिंदीतही अनेक चित्रपट याच नावाचे आले आहेत. १९८८ साली मिथुन चक्रवर्तीच्या एका चित्रपटाचे नावही कमांडो असेच होते. आता अलीकडेच हिंदीत आलेला विद्युत जमवाल हा अ‍ॅक्श हीरो म्हणून रुपेरी पडद्यावर गाजू पाहतोय. त्याच्या नवीन  चित्रपटाचे नाव ‘कमांडो’ असेच असून दिलीप घोष दिग्दर्शित हा चित्रपट आहे.
विद्युत जमवाल अ‍ॅक्शनपट करत असतानाच म्हणे दुसरीकडे महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणार आहे. त्यासाठी त्याने म्हणे व्यवस्थित एक कोर्स तयार केला आहे. स्वसंरक्षण करण्याच्या साध्यासोप्या क्लृप्त्या, तंत्र शिकून त्यांचा सराव केला तर महिलांना स्वसंरक्षण सहजपणे करता येईल, असा त्याचा दावा आहे. ‘कमांडो’ चित्रपटाचे निर्माता विपुल शहा यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या प्रकारच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणाला पाठिंबा दिला आहे.
‘फोर्स’ या चित्रपटातून जॉन अब्राहमच्या विरोधातील अ‍ॅक्शन करून विद्युत जमवालला हिंदी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. मार्शल आर्ट्समध्ये तो प्रशिक्षित असून कलारिपयाट्टू या केरळमधील पारंपरिक पद्धतीच्या मार्शल आर्ट्सचेही त्याला ज्ञान आहे म्हणे.
महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून त्याचा फायदा विद्युत जमवाल लोकप्रिय होऊ पाहतोय. त्यापेक्षाही सिनेमाच्या प्रसिद्धी आणि विपणनाचा नवा फंडाच निर्माता विपुल शहा यांना सापडलाय असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरू शकेल. असो, निदान महिलांना स्वसंरक्षणाचे चांगले धडे तरी गिरविता येतील.