गोंदिया व भंडारा हे जिल्हे धान उत्पादनाचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध आहेत. गोंदिया जिल्ह्य़ात धानपिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जात असले तरी मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल ऊस उत्पादनाकडे वळला आहे. यामुळेच जिल्ह्य़ात २०१२-१३ या वर्षांत एकूण २४८८ हेक्टर जमिनीवर उसाची लागवड करण्यात आली असून, ऊस उत्पादनासाठी अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी या तालुक्यातील शेतकरी अग्रेसर ठरले आहेत.
तांत्रिक व सुधारित पद्धतीने शेती करून जास्तीत जास्त उत्पादन कशा पद्धतीने मिळविता येईल, याकडे शेतकरी आता वळले आहेत. गेल्या काही वर्षांंपासून वरुणराजाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना वारंवार नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शेतकरी पुरता कर्जाच्या खाईत सापडला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तांत्रिक पद्धतीने शेती करून रोख उत्पादन देणाऱ्या पिकांकडे आता जिल्ह्य़ातील शेतकरी वळले आहेत.
गेल्या ३ ते ४ वर्षांपासून जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावर उसाची लागवड केली होती. यात शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाल्याने इतर शेतकऱ्यांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ऊस लागवडीकडे लक्ष दिले.
शेतकरी आता पाहिजे त्या प्रमाणात धानपिकाच्या आशेवर राहिले नाहीत.  उसासह केळी, हळद, काकडी, टरबूज, पपई व इतर भाजीपाल्यांचे उत्पादन घेण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. एकूण २४८८ हेक्टरपैकी गोंदिया तालुक्यात नवीन ऊस लागवड ३६ हेक्टर, तर खोडवा ९१ हेक्टर जमिनीवर, तिरोडा तालुक्यात नवीन लागवड १४ हेक्टर , आमगाव तालुक्यातील नवीन लागवड १६ हेक्टर , गोरेगाव तालुक्यात ३५ हेक्टर , सालेकसा तालुक्यात ५ हेक्टर , तर खोडवा २८ हेक्टर जमिनीवर, देवरी तालुक्यात नवीन लागवड ३५ हेक्टर जमिनीवर, तर खोडवा ११० हेक्टरवर, अर्जुनी मोरगाव तालुक्यात नवीन लागवड ६७१ हेक्टरवर, तर खोडवा ४७० हेक्टरवर, तसेच सडक अर्जुनी तालुक्यात नवीन ऊस लागवड ७६६ हेक्टर, तर खोडवा २०१ हेक्टर जागेत ऊस लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील उसाकरिता पूर्ती उद्योगसमूहाचा देव्हाळा येथील वैनगंगा साखर कारखाना व लाखांदूर येथील एवनएग्रो हा साखर कारखाना खरेदीकरिता तयार आहे.