भंडारदरा येथे फिरण्यासाठी म्हणून आलेली मुंबईतील दोन शाळकरी मुले पाण्यात बुडून मरण पावली. रात्री ८ वाजता एकाचा मृतदेह सापडला, मात्र रात्री उशिरापर्यंत दुसऱ्याचा मृतदेह सापडला नव्हता.
अरिफ नसीम खान (वय,२३) व सिद्धांत संतोष माळवदे (वय १६, दोघेही राहणार मीरा रोड ठाणे) अशी पाण्यात बुडालेल्या मुलांची नावे आहेत. ते व त्यांचे आणखी ४ मित्र शाळांना सुटया लागल्यामुळे फिरण्यासाठी म्हणून भंडारदऱ्याला आले होते. एमटीडीसीच्या गेस्ट हाऊसमध्ये ते उतरले होते.
दुपारी पोहण्यासाठी म्हणून ते धरणाच्या पाण्यात गेले. पाण्याच्या कडेला बसून ते मजा करत होते. तसे करत असतानाच माळवदे याचा पाय घसरला व तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी म्हणून अरीफ पुढे झाला तर त्याचाही पाय घसरून तोही पाण्यात पुढे गेला. दोघेही एकमेकांना धरूनच पाण्यात बुडाले. आरडाओरडा सुरू झाल्यावर गर्दी जमा झाली, मात्र तोपर्यंत ते पाण्यात बरेच पुढे वाहत गेले.
अकोले पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम. एम. कासार तसेच अन्य काहीजण बराच काळ मृतदेहाचा तपास घेत होते. दरम्यानच्या काळाच मुलांचे नातेवाईकही आले. रात्री ८ वाजता अरीफचा मृतदेह सापडला.