तालुक्यात पाणलोट विकास कार्यक्रमासाठी केंद्र शासनाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाकरिता ४३ गावांची निवड केली असून त्याकरिता २५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तालुक्याबरोबर मतदार संघात शासकीय खर्चाने उपसा सिंचन योजनेची मोठय़ा प्रमाणात कामे हाती घेण्यात आली आहेत. कोणीही कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी तालुक्यातील शेतजमिनी सिंचनाखाली आणणार असल्याचे प्रतिपादन आ. निर्मला गावित यांनी केले.
कृषी, ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम जनजागृती अभियान व जल व भूमी संधारण अभियान या अंतर्गत त्रिंगलवाडी येथे पाणलोट समिती कार्यालयाचे उद्घाटन व भात खाचरे कामाचा शुभारंभ गावित यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार गोविंद शिंदे उपस्थित होते.
प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे यांनी कृषी विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी शेतकरी मेळाव्यात आ. गावित यांनी तालुक्यास पाणलोट क्षेत्र विकासासाठी प्रथमच भरीव निधी प्राप्त झाल्याचे सांगितले. स्पर्धेच्या युगात शेतकरी समर्थपणे उभा रहावा म्हणून शेतीला पाणी मिळण्याची गरज आहे. उपसा सिंचन योजनेतून तालुक्यातील शेतजमीन सिंचनाखाली आणली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. चिंगलवाडी ते बलायदूरी रस्त्यांचे काम पंतप्रधान सडक योजनेत समाविष्ट केले असून त्याकरिता ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आ. गावित यांनी सांगितले.
एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत ४३ गावांचा समावेश झाला आहे. त्यात त्रिंगलवाडी, भावली बुद्रुक, पिंपळगाव भटाटा, कोरपगाव, कुर्णोली, धार्नोली, आडवण, बलायदुरी, जांगुडे, गवांडे, कांचनगाव, भरवज, निरपण, कुरुंगवाडी, मांजरगाव आदी गावांचा समावेश आहे.