तब्बल तीन दशकांनंतर ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात बढती मिळालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेशी एक तपापूर्वी काडीमोड घेऊन वेगळे झालेल्या २७ गावांची सद्य:स्थिती अतिशय विदारक आहे. गाव परिसरात एकीकडे बडय़ा बांधकाम व्यावसायिकांची टुमदार नागरी संकुले तर दुसरीकडे अनधिकृत बांधकामांच्या बकाल वस्त्या उभ्या राहिल्या आहेत. अर्धनागरीकरणाच्या या प्रक्रियेत गावे आपला चेहरा हरवून बसली आहेत. त्यामुळे स्वयंपूर्ण ग्राम संस्कृतीचे स्वप्न उराशी बाळगून महापालिका प्रशासनास विरोध करणाऱ्या संघर्ष समितीतील बहुतेक सदस्यांचा भ्रमनिरास झाला असून आता आणखी एका नव्या महापालिकेत अथवा नगरपालिकेत जाण्यापेक्षा मूळच्या कल्याण-डोंबिवलीतच राहणे श्रेयकर असल्याच्या निष्कर्षांप्रत ते आले आहेत. आसदे ग्रामपंचायतीने तर तसा रीतसर ठराव करून उघडपणे इच्छा प्रदर्शित केली आहे. मात्र यासंदर्भात सर्व गावांनी एकत्रितपणे निर्णय घेणे श्रेयकर ठरेल, अशी प्रतिक्रिया २७ गाव संघर्ष समितीच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.  
कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळण्यात आलेली २६, नवी मुंबईतून वगळण्यात आलेली १४ आणि ठाणे महापालिकेतून वगळण्याचा ठराव झालेल्या १५ अशा ५५ गावांची स्वतंत्र महापालिका अथवा तीन नगरपालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन वर्षांपूर्वीच नगरविकास खात्याकडे पाठविला आहे. मात्र शासनाने अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान अशा कोणत्याही नव्या प्राधिकरणात समाविष्ट होण्यापेक्षा भौगोलिक आणि समाजिकदृष्टय़ा जवळ असणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतच राहण्याचा तिसरा पर्याय स्वीकारण्याच्या मन:स्थितीत अनेक ग्रामपंचायती आहेत. विशेषत: कल्याण तालुक्यातील डोंबिवलीलगतची गावे त्या मताची आहेत. कारण कल्याण-डोंबिवली महापालिकेतून ‘स्वतंत्र’ झाली असली तरी ही गावे शहरीकरण थोपवू शकली नाहीत. परिणामी सध्या निम्मेअधिक डोंबिवली शहर या वगळण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतच आहे. डोंबिवली शहराचा भविष्यातील विस्तारही या ग्रामपंचायतींच्या हद्दीतच होतो आहे.
शासनाच्या प्रस्तावाप्रमाणे जर अंबरनाथ, कल्याण आणि ठाणे तालुक्यातील ५५ गावांची महापालिका अस्तित्वात आली तर डोंबिवली शहरात दोन महापालिका प्रशासन अशी व्यवस्था निर्माण होईल. कारण कल्याण तालुक्यातील १८ गावांपैकी बहुतेक गावे आता डोंबिवली शहराचा भाग झाली आहेत. विशेषत: सागांव, आजदे, नांदिवलीतर्फे पाचानंद, संदप, भोपर ही गावे डोंबिवली शहराशी एकरूप झाली आहेत. काटई, निळजे आदी गावे विस्तारित डोंबिवली म्हणून ओळखली जातात. त्यामुळे त्यांना वेगळे ठेवून डोंबिवली शहराच्या अस्तित्वाचा तूर्त विचारही करता येत नाही.
लोकसंख्येचा स्फोट..
महापालिकेतून वगळलेल्या कल्याण तालुक्यातील या गावांची लोकसंख्या अतिशय झपाटय़ाने वाढत आहे. २००१ च्या जनगणनेनुसार या गावांची लोकसंख्या १ लाख १२ हजार ९६१ होती. दहा वर्षांत ती जवळपास दुपटीने वाढून २०११ च्या जनगणेनुसार २ लाख २२ हजार ५३५ इतकी झाली आहे. महापालिकेतून वगळण्यात आलेल्या १८ गावांपैकी नऊ गावांची लोकसंख्या दहा हजारांपेक्षा अधिक आहे. पिसवली (३० हजार ९२१), गोळवली (१९ हजार ९८६), सोनारपाडा (१५ हजार २८४), आसदे (२४ हजार २२९), निळजे आणि काटई (प्रत्येकी १७ हजार ८६) तर नांदिवली तर्फे पाचानंदची लोकसंख्या ३५ हजार ५९६ इतकी नोंदली गेली आहे. गेल्या तीन वर्षांत ही लोकसंख्या कितीतरी पटीने वाढली आहे.
 कारण याच परिसरात बडय़ा विकासकांच्या आलिशान नागरी वसाहती उभ्या राहत आहेत.
उरले अवघे २८ टक्के क्षेत्रफळ  
१९८३ मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिका अस्तित्वात आली. तेव्हा तिचे क्षेत्रफळ २३६ चौरस किलोमीटर होते. मात्र भौगोलिक सलगता हा निकष डावलून उल्हासनगरला वगळून अंबरनाथ-बदलापूरचा समावेश केल्याने स्थापनेपासूनच ती वादग्रस्त ठरली. त्यातून १९९२ ला विभाजन होऊन अंबरनाथ-बदलापूर तसेच २० खेडी वगळण्यात आली. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी २००२ मध्ये कल्याण तसेच अंबरनाथ तालुक्यातील २६ गावे या महापालिकेतून वगळण्यात आली. परिणामी आता या महापालिकेचे क्षेत्रफळ अवघे ६७ चौरस किलोमीटर म्हणजेच २८ टक्केच उरले आहे.