आतापर्यंत केवळ हॉलिवूडच्या सिनेमात वापरात आणल्या गेलेल्या ‘थ्रीडी मॅपिंग’च्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या पण तितक्याच नयनरम्य अशा तंत्राची करामात एका सिनेमाच्या निमित्ताने यंदा पवईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) ‘टेकफेस्ट’ या तंत्र महोत्सवात पाहायला मिळणार आहे. या ‘जून’ नामक सिनेमाचा जागतिक प्रीमियर या टेकफेस्टमध्ये होणार आहे. हा सिनेमा ११ इटालियन कलाकारांनी मिळून तयार केला असला तरी तो मुंबईकरांशी निश्चितपणे नाळ जोडणारा ठरेल. कारण, तो मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानकावर घडतो.
आयआयटीचा टेकफेस्ट ३ ते ५ जानेवारी दरम्यान पवईच्या संकुलात रंगणार आहे. त्यावेळी तंत्रज्ञानाशी संबंधित स्पर्धाबरोबरच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे. यात परदेशी कलाकारांच्या ‘करामती’ कार्यक्रमांचाही समावेश असेल. त्यापैकीच एक म्हणजे जून हा सिनेमा.
‘जून’ची कथा एका भीक मागणाऱ्या तरूण मुलीच्या आयुष्यावर बेतलेली आहे. ही एक ४० मिनिटांची संगीतिका आहे. त्यामुळे डोळ्याचे पारणे फेडण्याबरोबरच ती कानांनाही सुखावून जाईल. ही कथा घडते मुंबई सेंट्रल या पश्चिम रेल्वेच्या स्थानकावर. यात प्रत्यक्ष रेल्वे स्थानकाचे शूटिंग नाही. त्याऐवजी कलाकारांनी संपूर्ण मुंबई सेंट्रल स्थानकच थ्रीडी मॅपिंग तंत्राद्वारे तयार केले आहे. हे व्हर्चुअल रेल्वे स्थानक घडविण्याच्या निमित्ताने तसेच मुंबईच्या जीवनाचा अंदाज येण्यासाठी या सिनेमाच्या निर्मितीत सहभाग असलेल्या इटालियन कलाकारांनी मुंबईत काही काळ वास्तव्य केले होते.
‘टेकफेस्टमध्ये हे तंत्र पहिल्यांदाच आणले गेले आहे. त्यामुळे, हा शो निश्चितपणे उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फेडणारा ठरेल,’ असा विश्वास टेकफेस्टच्या आयोजकांपैकी एक असलेल्या दिव्यम बन्सल या विद्यार्थ्यांने व्यक्त केला. यात व्हर्चुअल रेल्वेगाडी ये-जा करताना दिसतील. या रेल्वेतून उतरणारे, चढणारे शेकडो प्रवासी कलाकारांनी केवळ थ्रीडी मॅपिंग तंत्राच्या सहाय्याने तयार करण्यात आले आहेत. हे तंत्र आतापर्यंत केवळ हॉलिवूड सिनेमातच वापण्यात आले आहे. या सिनेमाच्या निमित्ताने भारतीयांनी याची ओळख होईल, असे दिव्यम याने सांगितले.
कॅटलीनचा व्हॉयोलीन
जून या सिनेमाबरोबरच ‘कॅटलीन’ या इलेक्ट्रॉनिक व्हायोलिनमध्ये ‘मास्टर’ समजल्या जाणाऱ्या कलाकाराचेही सादरीकरणही असणार आहे. फिफा आणि चॅम्पीयन्स ट्रॉफी या स्पर्धामध्ये आपल्या कलेचे सादरीकरण करण्याचा मान कॅटलीनला मिळाला होता. या शिवाय अमेरिकेच्या गॉट टॅलेन्ट वर्ल्डमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या चार्ल्स पिकॉक या जादूगाराच्या करामतीही प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. टेकफेस्टच्या संकेतस्थळावर या कार्यक्रमांची माहिती घेता येईल.