‘आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती’ योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्य़ाच्या दुर्गम व आदिवासी भागातील मुला-मुलींच्या सहलीची चौथी फेरी पार पाडली. या फेरीत अतिदुर्गम भागातील ९० मुले-मुलींनी सहलीचा आनंद घेऊन ते २५ डिसेंबरला गडचिरोलीत पोहोचले. त्यानिमित्ताने या सहलीचा समारोप कार्यक्रम पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आला.
या सहलीत सहभागी झालेले ११ विद्यार्थी नक्षलवाद्यांचे नातेवाईक होते, तर २३ विद्यार्थी नक्षलवादग्रस्त होते. उर्वरित विद्यार्थी दुर्गम भागातील होते. या सहलीच्या समारोपीय कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक टी.एस.के. रेड्डी, पोलीस अधीक्षक मो. सुवेज हक यांच्यासह स्थानिक पत्रकार व अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थी, तसेच नक्षलवाद्यांच्या नातेवाईकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दक्षिण गडचिरोलीचा डीवीसी भास्कर यवजी हिचामी या कट्टर नक्षलवाद्याचा भाऊ म्हणाला, नक्षलवाद ही गडचिरोली जिल्ह्य़ाच्या विकासाला बसलेली खीळ आहे. त्यामुळेच मुंबई, पुणे, नागपूरसारखी प्रगती आपल्याकडे होत नाही. महाराष्ट्र दर्शनानंतर आता आम्हाला पटले की, आम्ही किती मागासलेले आहोत. यामागील नक्षलवाद हेच मुख्य कारण असून मी तो संपविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन आणि याची सुरुवात स्वत:च्या घरापासूनच करीन. भाष्कर जेव्हा घरी येईल तेव्हा त्याला मी आणि माझी बहीण नक्कीच आत्मसमर्पणासाठी परावृत्त करू. यावेळी डीवीसी भाष्करची बहीण सावित्री हिचामी उपस्थित होती.
कसनसूर दलम कमांडर रंजीता बिरजा उसेंडी हिची भाची वनिता सुकरू उसेंडी म्हणाली, आमच्या गावातून माझी आत्या रंजीता व भास्कर हे नक्षल दलममध्ये गेलेले आहेत. आम्ही आता बाहेरचे जग बघितल्यानंतर त्यांना नक्कीच आत्मसमर्पणबद्दल समजावून सांगू.
नक्षलवादग्रस्त महेंद्र लालसू पुंगाटी म्हणाल, २००५ मध्ये नक्षलवाद्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली, परंतु नक्षलवाद्यांची मुले त्यासाठी गुन्हेगार ठरत नाहीत. कारण, त्यात त्यांचा काहीही दोष नसतो आणि म्हणूनच केवळ पोलिसांच्या सहकार्याने आज आम्ही नक्षलवादग्रस्त आणि नक्षलवाद्यांची मुले-मुली चांगले मित्र झालो आहोत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी धमेंद्र जोशी यांनी केले. पोलीस उपअधीक्षक डी.बी. ईलमकर यांनी आभार मानले.