घरची परिस्थिती गरिबीची, आई-वडील आहेत किंवा नाहीत, मोठय़ा बहिणीचे लग्न करायचे आहे, काही जण शाळेत जात आहेत किंवा काहींनी शिक्षण अर्धवट सोडले आहे, काही जणांनी घरी आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने घरच्यांच्या परवानगीने घर, गाव सोडले तर काही मुंबईचे आकर्षण म्हणून घरच्यांना न सांगता मुंबईत पळून आले. मुंबईत बाल कामगार म्हणून राबराब राबून त्यांना काही पैसे मिळतही होते. पण मायेची उब मिळत नव्हती. कधी घरच्यांच्या आठवणीने मन बैचेन होत होते. अशा ५५ मुलांची घरवापसी झाली आहे.
बिहार राज्याच्या विविध भागांतून मुंबईत आलेल्या आणि बालकामगार म्हणून काम करणाऱ्या ५५ मुलांना सोमवारी रात्री मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटणाऱ्या मुंबई- पटना राजेंद्रनगर एक्स्प्रेस गाडीने मूळ गावी पाठविण्यात आले. ‘माय होम इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेच्या उपक्रमातून या सर्व मुलांची ‘घरवापसी’ झाली आहे. या वेळी संस्थेचे संस्थापक सुनील देवधर, राष्ट्रीय समन्वयक मिथीलेश झा, प्रकल्प समन्वयक हिमांशु सक्सेना, संस्थेचे अन्य पदाधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते. ‘आता आम्ही पुन्हा मुंबईत येणार नाही, गावी राहूनच शिक्षण पूर्ण करू आणि अन्य मुलांनाही मुंबईला जाण्यापासून परावृत्त करू’, अशी प्रतिक्रिया यापैकी काही मुलांनी ‘मुंबई वृत्तान्त’कडे व्यक्त केली.
यापैकी बहुतांश मुले ही बिहार राज्यातील मोतीहारी, लखीसराई, समस्तीपूर, सीतामढी येथून मुंबईत आलेली होती. मोतीहारी जिल्ह्यातून आलेल्या मोहम्मद इकरामून हा मुलगा म्हणाला, मुंबईत मदनपुरा येथे एका बॅग तयार करणाऱ्या छोटय़ा कारखान्यात मी काम करत होतो. घरी आई-वडील असतात. घर सोडून मुंबईत आलो खरा, पण घरच्यांची खूप आठवण येत होती. सकाळी ९ वाजल्यापासून रात्री बारावाजेपर्यंत काम करावे लागायचे. आठवडा ते आठवडा असा आम्हाला आमच्या कामाचा मोबदला मिळायचा. तो काही पुरेसा होता असे नाही. एकदा कारखान्यावर पोलिसांची धाड पडली आणि मला बालसुधार गृहात पाठविण्यात आले. आज मी माझ्या घरी चाललो आहे. गावी राहूनच मला मोठे व्हायचे आहे. मुंबईच्या आकर्षणापोटी जी मुले घर सोडून मुंबईत येतात, त्याना माझे सांगणे आहे की, असा वेडेपणा करू नका.
सीतामढी येथून आलेला मोहम्मद तोलीफ सांगतो, माहीम येथे शिवणकाम करत होतो. महिन्याला चार हजार रुपये इतका मोबदला मिळत होता. त्यातील अर्धी रक्कम मी गावाला पाठवत होतो. पण घरच्यांची आठवण येतच होती. आता मला पुन्हा घरी जायला मिळतंय याचा खूप आनंद आहे.
सीतामढी येथील निसरुद्दिन हाही बॅग तयार करण्याच्या कारखान्यात काम करत होता. ही तीन मुले केवळ प्रातिनिधिक झाली. पण यापैकी सर्वच मुलांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. घरात कमावते कोणी नाही आणि खाणारी तोंडे भरपूर, असे चित्रही सगळ्यांच्या बाबतीत सारखेच आहे.
बिहार किंवा भारताच्या अन्य काही राज्यांतून ही लहान मुले मुंबईत येतात खरी. पण येथे आल्यानंतर अनेकांचा भ्रमनिरास होतो. वास्तवाचे चटके बसतात. काही दाहक अनुभवांनाही त्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी त्यांना सावरून, त्यांच्या मनात घरी जाण्याविषयीचे महत्त्व पटवून देऊन त्यांना सुखरूप घरी पोहोचविणे महत्त्वाचे असते. ‘माय होम इंडिया’ आणि याच संस्थेच्या ‘सपनों से अपनों’तक या उपक्रमातून आम्ही हे काम करत असल्याचे संस्थेचे मिथीलेश झा, हिमाशु सक्सेना आणि सुनील देवधर यांनी सांगितले.
दरम्यान डोंगरी बालसुधार गृहात असलेल्या या मुलांना सोमवारी दुपारी राज्याच्या महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या उपस्थितीत हृद्य निरोप देण्यात आला. या वेळी बालगृहाचे अधीक्षक जाधव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. डोंगरी येथील बालसुधार गृहात ऑगस्ट २०१४ पासून आत्तापर्यंत १ हजार ९३१ मुले व ४८७ मुली असे एकूण २ हजार ४१८ जण दाखल झाले होते. याच कालावधीत २ हजार ३८६ मुलांची येथून सुटका करून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती विद्या ठाकूर यांनी दिली.