केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्य़ातून ६० हजार नागरिकांचा शुभसंदेश पाठविण्यात आला आहे. शुक्रवारी शिवाजी चौकात शुभसंदेशाच्या प्रती पाठविण्याचा कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १२ लाख १२ हजार १२ नागरिकांच्या स्वाक्षरीचे शुभ संदेश देण्याचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हाती घेतला आहे. कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने ही मोहीम गेली काही दिवस राबविली जात होती. त्याला शहरी व ग्रामीण भागातील नागरिक, पवार प्रेमी कार्यकर्ते यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुभसंदेशाच्या पुस्तिकेवर सह्य़ा करताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जाणवत होता. या मोहिमेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्य़ातून ६० हजार नागरिकांचे शुभ संदेश मिळाले. या शुभ संदेशाच्या प्रती शुक्रवारी पुण्याहून आलेले प्रतिनिधी सुधीर शिंदे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष आमदार के.पी.पाटील व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आर.के.पोवार यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आल्या. श्री.पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबरला शहर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमास नगरसेवक राजू लाटकर, रमेश पोवार, शारदा देवणे, शैलेश गायकवाड, बाबासाहेब जगताप, लाला जगताप, दिग्विजय राणे, अरूण इंगवले, महिला आघाडी अध्यक्षा देवयानी साळोखे आदी उपस्थित होत्या.