अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतर्फे होऊ घातलेल्या ९४ व्या नाटय़ संमेलन नागपूरला घेण्याचे निश्चित झाले असताना केवळ नागपूर शाखेचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांमधील हेव्यादाव्यांमुळे संधी नागपूरच्या हातून निसटली आहे. याबद्दल अनेक नाटय़प्रेमी रसिकांनी आणि कलावंतानी ‘लोकसत्ता’शी बोलताना नाराजी व्यक्त केली. मुंबईत मंगळवारी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत संमेलन स्थळाबाबत निर्णय होऊन त्यात पंढरपूरला संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. नागपूरकर रसिक आणि कलावंतांच्या तोंडाशी आलेला घास केवळ झारीतील शुक्राचार्यामुळे हिरावला गेला.
नाटय़ संमेलन नागपुरात होऊ नये यासाठी नागपुरातीलच काही झारीतील शुक्राचार्यानी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समजते. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकारिणी आणि कलावंतमध्ये वाद आहे. कार्यकारिणीची मुदत संपल्यानंतर अनेक कलावंतानी निवडणूक घेण्याची मागणी केली होती मात्र, कार्यकारिणीने सहा महिन्यासाठी मुंदत वाढवून घेतली. काही कलावंत या विरोधात न्यायालयात गेले होते. त्यामुळे कलावंतामध्ये असलेली दुरी आणखीच वाढली होती. गेल्या महिन्यात परिषदेचे अध्यक्ष अभिनेते मोहन जोशी आणि प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर नागपुरात नाटय़ संमेलन स्थळाची पाहणी करण्यासाठी आले होते त्यावेळी कार्यकारिणीतील काही कलावंतानी नागपुरात संमेलन व्हावे यासाठी जोर लावला होता. जोशी आणि करंजीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. दरम्यानच्या काळात कार्यकारिणी आणि कलावंतामधील आपसी हेवेदावे आणखीच वाढले आणि त्याची सगळी माहिती मध्यवर्ती शाखेकडे दिली जात होती. राज्याचे परिवहन राज्यमंत्री आणि नियामक मंडळाचे सदस्य उदय सामंत नागपूरला आले असताना ते सुद्धा संमेलन घेण्याबाबत ठाम होते. त्यांनी मधल्या काळात राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला मात्र मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले आणि अखेर पंढरपूरला नाटय़ घेण्याचे संमेलन निश्चित झाले.
या संदर्भात ज्येष्ठ नाटय़ कलावंत आणि दिग्दर्शक मदन गडकरी म्हणाले, नागपूर संमेलन घेण्याचे जवळपास निश्चित झाले असताना ऐनवेळी याचा मान पंढरपुरला जावा याचे वाईट वाटते. विदर्भातील सर्व रंगकर्मी एकत्र आले ते होऊ शकले असते. गेल्या अनेक दिवसात सर्व कलावंतांची साधी बैठकसुद्धा झाली नाही. कोणाला विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे काही कलावंताची नाराजी होती. संमेलन हा कलावंतांचा एक सोहळा असतो. नागपुरात ८४-८५ मध्ये नागपूरला नाटय़ संमेलन झाले होते त्यावेळी सर्व कलावंतांनी एकत्र येऊन दिवसरात्र काम केले होते. मात्र, आता काही निवडक कलावंतांमधील वादामुळे एकेकाळी नागपुरात नाटय़ चळवळीत चांगले वातावरण असताना अशा पद्धतीचे वातावरणामुळे एक वेगळा संदेश जातो अशी खंत गडकरी यांनी व्यक्त केली.
नाट्य कलावंत निरंजन कोकर्डेकर म्हणाले, संमेलन नागपूरला होईल अशी आशा होती मात्र कलावंताच्या वादामुळे ते होऊ शकले नाही ही सर्व कलावंताच्या दृष्टीने वाईट बाब आहे. येणाऱ्या काळात सर्व कलावंतानी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष आणि नियामक मंडळाचे उपाध्यक्ष प्रमोद भुसारी म्हणाले, काही कलावंतानी विरोध केल्यामुळे आणि तसे मध्यवर्ती शाखेकडे तक्रारी करण्यात आल्यामुळे नागपूरला संमेलन होऊ शकले नाही. जे झाले ते वाईट झाले आहे. आम्ही नागपूरला संमेलन आणण्यासाठी कुठे तरी कमी पडलो अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नाटय़ परिषदेच्या कार्यकारिणीची निवडणूक लवकरच घोषित करण्यात येणार असल्याचे भुसारी यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Oct 2013 रोजी प्रकाशित
झारीतील शुक्राचार्यामुळे नागपूरच्या तोंडचा घास पंढरपूरने पळविला
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतर्फे होऊ घातलेल्या ९४ व्या नाटय़ संमेलन नागपूरला घेण्याचे निश्चित झाले असताना केवळ नागपूर शाखेचे पदाधिकारी
First published on: 22-10-2013 at 08:33 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 94th natya sammelan now in pandharpur