पुणे-सांगली पोलिसांना गेली सहा वष्रे चकवा देणा-या पंडित राठोड (वय २८, रा. नेरुळ, नवी मुंबई) याला सांगली पोलिसांनी नवी मुंबईत अटक करून त्याची रवानगी कोठडीत केली आहे. भूखंडमाफियांबरोबरच बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष देऊन कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याचे आरोप पंडित राठोडवर आहेत. बालवाडी व अंगणवाडय़ांना अनुदान देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी सांगली जिल्हय़ातील तासगाव, आटपाडी, मिरज व कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात राठोड विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ठकसेन राठोड याने २००७ मध्ये बाल शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मंडळातर्फे (बीसीईआरटी) बालवाडी, अंगणवाडय़ा सुरू करण्यासाठी अनुदान देण्याचे आमिष दाखवून जिल्हय़ात अनेकांना गंडा घातला होता. आटपाडी तालुक्यात ५७ बालवाडी व अंगणवाडय़ा सुरू करून देतो, असे जाहीर करून डिमांड ड्राफ्ट (डी.डी.) मार्फत पसे गोळा केले होते. ३८ हजार ३०० रुपयांची फसवणूक केली म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. कवठेमहांकाळ तालुक्यात शिक्षणसेविका नेमण्याची खोटी जाहिरात करून अडीच ते तीन हजार रुपयेप्रमाणे डी. डी. मागवून पसे गोळा केले. एक लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मिरज तालुक्यात २७१ लोकांकडून अंगणवाडय़ासाठी पसे घेऊन १ कोटी २८ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक केली होती. मिरज शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे.
ठकसेन राठोडने समर्थ अ‍ॅग्रोटेक प्रा. लि., पुणे ही बोगस कंपनी स्थापन करून शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके पुरवतो असे दाखवले. कंपनीला पुणे येथे अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन्यासाठी खोटय़ा निविदा काढून नोकरभरती करायची आहे, अशी जाहिरात प्रसिद्ध केली. नोकरभरतीच्या आमिषाने तरुणांकडून ४६ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हय़ातील चार गुन्हय़ांपकी कवठेमहांकाळ आणि मिरजेतील गुन्हय़ांचा तपास कोल्हापूर येथील सीआयडीचे पथक करत आहे. तासगावचा गुन्हा सांगली सीआयडीकडे आहे. जिल्हय़ातील चार गुन्हय़ांत तो फरारी होता. तसेच राजगड पोलीस ठाण्यातील दोन गुन्हय़ांतही तो फरारी आहे. नेरुळ येथे पोलीस पथकाने त्याला अटक केली. आटपाडीतील गुन्हय़ात त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. २० नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.