बडय़ा बिल्डरांचा आवडता मतदारसंघ

मुंबईचा परिघ अशी ओळख असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शहरी विभागात विखुरलेले विधानसभा मतदार संघ, प्रमुख उमेदवारांची ओळख आणि विभागाविषयीची त्यांची मते आजपासून ठाणे वृत्तान्त एम इंडिकेटरमध्ये देत आहोत..

मुंबईचा परिघ अशी ओळख असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शहरी विभागात विखुरलेले विधानसभा मतदार संघ, प्रमुख उमेदवारांची ओळख आणि विभागाविषयीची त्यांची मते आजपासून ठाणे वृत्तान्त एम इंडिकेटरमध्ये देत आहोत..    

ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली अशा शहरांना खेटून असूनही या मतदारसंघाचा बाज मात्र अजूनही अस्सल ग्रामीण असा आहे. डोंबिवलीस लागून असलेली २२ गावे, ठाणे-नवी मुंबईच्या वेशीवरील १४ गावे आणि बेकायदा बांधकामांचे आगर बनलेले दिवा आणि आसपासच्या परिसरातील गावांचा या मतदारसंघात समावेश होतो. ठाणे शहरातील इंच इंच जमिनीवर विकास प्रकल्प ऊभे केल्यानंतर मुंबईतील बडय़ा बिल्डरांनी आता डोंबिवली, नवी मुंबईस खेटून असलेल्या या ग्रामीण पट्टय़ाकडे लक्ष केंद्रित केले आहे. या विकासासाठी शेतक ऱ्यांच्या जमिनींचे मोठय़ा प्रमाणावर संपादन होत असून या भागातील प्रचाराचा केंद्रिबदू याच मुद्दय़ाच्या अवती-भोवती फिरत रहाणार आहे.
पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश पाटील यंनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत आठ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र रमेश पाटील यांचे बंधू राजू पाटील यांचा दणकून पराभव झाला. मुंबईतील प्रथितयश बिल्डर लोढा समूहाचा मोठा बांधकाम प्रकल्प या मतदारसंघात उभा राहात आहे. राज्य सरकारने या टाऊनशीप प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविताना आसपासच्या गावांच्या विकासाकडे मात्र पाठ फिरवली आहे. जमीन संपादन होत असताना शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असल्याचे वातावरण उभे करत शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत मनसेला कोंडीत पकडले होते. यंदाही शिवसेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांनी याच मुद्दय़ावर प्रचाराचा रोख ठेवला आहे. काँग्रेसने येथून शारदा पाटील यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसने वंडार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे सुभाष भोईर स्थानिक नसल्याचा मुद्दा मनसेने प्रचारात आणला असला तरी लोढा बिल्डरचा विकास प्रकल्प आणि शेतक ऱ्यांच्या जमीन संपादनाच्या मुद्दय़ावरून मनसेची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालविला आहे. बिल्डर, शेतक ऱ्यांच्या जमिनी या दोन मुद्दय़ांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या प्रचारामुळे येथील विकासाचे मुद्दे मात्र मागे पडल्याचे चित्र दिसू लागले आहे.

कल्याण ग्रामीण मतदारसंघातील ६३ गावांमध्ये रस्ते, पाणी, गटारे, या माध्यमातून ३५ कोटी रुपयांचा आमदार निधी खर्च केला आहे. खोणी येथे स्क्वेअर गार्डनच्या धर्तीवर अत्याधुनिक उद्यान विकसित करण्यासाठी ४३ एकर जमीन संपादित केली आहे. नेवाळी विमानतळाची पडीक जमीन शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन. या जागेवर सरकारने उद्योग-व्यवसाय सुरू करावे, रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात, अन्यथा ही पडीक जमीन शेतकऱ्यांना कसण्यासाठी परत करावी. यासाठी प्रयत्न करणार आहे. गृहसंकुल, शाळा आदी माध्यमातून विकासाचे अनेक प्रकल्प कल्याण ग्रामीण भागात आले आहेत. ग्रामीण भागाची स्वतंत्र महापालिका निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
रमेश पाटील, मनसे

ग्रामीण भागात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. तो सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे. ग्रामीण भागात रस्ते, पोट रस्ते, तयार करण्याला प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी कमी होईल. या भागातून रेल्वे मार्ग गेलेला आहे. योग्य ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल बांधण्यासाठी प्रयत्न करेन. ग्रामीण भागात अनेक गावांना पाण्याची टंचाई जाणवते. त्या गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
सुभाष भोईर,  शिवसेना

शिवसेना – सुभाष भोईर   शिक्षण – दहावी  मालमत्ता- जंगम- ४ कोटी ११ लाख २ हजार ८५१ स्थावर – ५२ कोटी २१ लाख ३३ हजार ५७८.
मनसे – रमेश पाटील   शिक्षण – बी. कॉम पार्ट – १   मालमत्ता- जंगम- ३०कोटी ३० लाख ६२ हजार ९३५ स्थावर- १४ कोटी ४२ लाख ७४ हजार ६२६.
राष्ट्रवादी – वंडार पाटील  शिक्षण – चौथी  मालमत्ता- जंगम- ९ लाख  २ हजार २२२ स्थावर- ३ कोटी १९ लाख९० हजार
काँग्रेस – शारदा पाटील   शिक्षण – सहावी   मालमत्ता- जंगम- १३ लाख ८६ हजार१५५ स्थावर- २९ लाख ८३ हजार ५००.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: An overview of kalyan gramin constituency