कोणताही सर्वसामान्य नाशिककर आपली सहज भेट घेऊ शकेल. त्यासाठी कोणा मध्यस्थाची गरज भासणार नाही किंवा कोणाला अडविले जाणार नाही, असे जाहीर करणारे नाशिक लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित उमेदवार हेमंत गोडसे यांच्या या वक्तव्याचा अनुभव त्यांना ओळखणाऱ्या सर्वानीच घेतला आहे. शांत स्वभाव, प्रत्येकाच्या मदतीस धावून जाण्याची वृत्ती, सर्वसामान्यांमध्ये असणारी ऊठबस, असत्याचा तिटकारा, कार्यकर्त्यांप्रमाणे काम, असे अनेक गुण समाविष्ट असण्यामुळेच नाशिकला ‘कार्यकर्ता खासदार’ मिळाला आहे. देवळालीजवळील संसरी हे हेमंत गोडसे यांचे गाव. याच गावाने यापूर्वी १९९६ मध्ये राजाभाऊ गोडसे हे खासदार दिले होते. विशेष म्हणजे तेही शिवसेनेचे होते. हेमंत हे राजाभाऊंचे चुलतपुतणे होय. गोडसे कुटुंबाची सध्या दिसणारी आर्थिक संपन्नता ही कष्टातून मिळालेली आहे. वडील लेखापरीक्षक असले तरी संसरीत असलेली शेती हे त्यांचे उपजीविकेचे मुख्य साधन. दहावीपर्यंत देवळाली हायस्कूल आणि त्यानंतर केटीएचएम महाविद्यालयात पुढील शिक्षण त्यांनी घेतले. १९९० मध्ये पुण्याच्या गव्हर्मेन्ट पॉलिटेक्निकमधून ते स्थापत्य अभियंता झाले. पदविका प्राप्त होताच २१ व्या वर्षी त्यांनी बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्यरत होण्याचे ठरविले. बांधकाम क्षेत्राविषयी सुरुवातीपासूनच रुची असल्यामुळे या क्षेत्रातच कारकीर्द करण्याचे हेमंत गोडसे यांनी ठरविले. वर्षांच्या अनुभवानंतर १९९१ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी या क्षेत्रात स्वतंत्रपणे पहिल्या इमारतीचे काम त्यांनी पूर्ण केले. कुटुंबावर कोणताही आर्थिक भार न पडू देता स्वत:च्या हिमतीवर केलेले हे धाडस पुढे त्यांच्या चांगलेच उपयोगी पडले. यादरम्यान परिसरातील सामाजिक कार्यातही ते सहभाग घेऊ लागले. मित्र परिवार वाढू लागला. तोपर्यंत राजकारण प्रवेश हे त्यांच्या स्वप्नातही नव्हते. २००७ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली. एकलहरा गट हा राखीव जाहीर झाला. परंतु जिल्हा परिषदेच्या एकूणच सर्व गटांमधील ठरविलेल्या आरक्षणाविरोधात कोणीतरी न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचा निकाल लागून नव्याने आरक्षण ठरविण्यात आले. आणि एकलहरा सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाला. गावातील काही ज्येष्ठ व्यक्ती आणि मित्रांच्या आग्रहास्तव त्यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरे यांच्या भाषणांची जादू गोडसे यांच्यावरही असल्याने त्यांनी मनसेचे उमेदवार होण्याचे ठरविले. त्यावेळी अवघ्या एक वर्षांच्या मनसेची गटातील १६ गावांमध्ये कुठेही शाखा नव्हती. गटात शिवसेनेचा जोर होता. तरीही गोडसे हे निवडून आले. संपूर्ण राज्यात बुलढाण्याचे विनोद वाघ आणि हेमंत गोडसे हे मनसेचे दोनच जिल्हा परिषद सदस्य तेव्हा विजयी झाले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून गोडसे यांनी जिल्ह्यात आपल्या गटात सर्वाधिक विकास कामे करून दाखवली. गटात विविध योजनांसाठी सर्वाधिक निधी त्यांनी मिळविला. जिल्हा परिषद सदस्य असताना एक घटना घडली. ज्यामुळे त्यांना चौदा दिवस तुरुंगवास भोगावा लागला. या घटनेने गोडसे हे व्यथित झाले. आपण कोणताही गुन्हा केलेला नव्हता. हे सर्वाना माहीत होते. तरीही आपली बाजू पक्षानेही घेतली नाही. आपण तुरुंगात असताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांना धीर देण्याचे काम केले नाही, याचे दु:ख अजूनही त्यांना वाटते. २००९ मध्ये मनसेने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या गळ्यात न मागता उमेदवारीची माळ घातली. राष्ट्रवादीचे बलाढय़ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याकडून त्यांना अवघ्या २२ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर महापालिका निवडणुकीत ते विजयी झाले. महापौरपदासाठी आपल्या नावाचा विचार होईल असे त्यांना वाटत होते. मनसेने महापालिकेसाठी लेखी परीक्षा व मुलाखतीव्दारे उमेदवार ठरविले. मग महापौर ठरविताना तसे का केले नाही, हा गोडसे यांचा प्रश्न आहे. पक्षाने स्थायी समिती सभापतीपदासाठी अर्ज भरण्यास सांगितले. नंतर तो मागे घेण्यास बजावले. या घटनाक्रमामुळे गोडसे हे पक्षापासून दूर होत गेले.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने नाशिकमध्ये प्रबळ उमेदवाराचा शोध सुरू केला होता. ही संधी साधत गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून खासदारकी हे ध्येय मनाशी बाळगत त्यांनी आपल्या परीने मतदारसंघात संपर्क अभियान राबविण्यास सुरुवात केली होती. उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांनी अक्षरश: वायूवेगाने प्रचारास सुरुवात केली. प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले. मतदारसंघातील ४५५ गावांपैकी ४३० गावांपर्यंत ते स्वत: दोन वेळा जाऊन आले. ग्रामीण भागात प्रचारात कोणताही गाजावाजा न करता थेट ग्रामस्थांना भावेल अशा पद्धतीने ते त्यांच्या समस्या जाणून घेत. गारपीटग्रस्तांची भेट घेण्यास गेल्यावर ते थेट जमिनीवर बसत. हे सर्व ग्रामस्थांच्या हृदयाला जाऊन भिडू लागले. हरसूलसारख्या टंचाईग्रस्त भागात स्वत:च्या खर्चाने टँकरव्दारे केलेला पाणीपुरवठय़ाबद्दल ग्रामस्थांकडून त्यांना धन्यवादाचे शब्द ऐकू येऊ लागले. त्यांच्या स्वभावामुळे दुसऱ्या पक्षातील मित्रांनीही त्यांच्यासाठी कार्य केले. सिन्नरमध्ये पंचायत समितीचे सभापती काँग्रेसचे बाळासाहेब वाघ यांना पक्षापेक्षा गोडसे यांची मैत्री महत्त्वाची वाटली. स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारी दोन्ही मुले, इतर नातेवाईक आणि संपूर्ण संसरी गावाने प्रचारास वाहून घेतले. ग्रामीण भागात गोडसेंचे वारे हळूहळू घोंघावू लागल्याने त्याचा परिणाम शहरी भागात होऊ लागला. जेव्हा प्रतिस्पर्धी उमेदवारांचा शहरी भागातील प्रचार संपत आला तेव्हा त्यांनी नाशिकच्या शहरी भागात प्रचारास सुरुवात केली. या सर्व सूक्ष्म नियोजनाचा परिणाम अचूक झाला. आणि नाशिकला नवीन खासदार मिळाला.