पावसाळ्याच्या दिवसात गडचिरोली जिल्ह्य़ातील नक्षलविरोधी पथकाच्या हालचालींवर र्निबध आल्याची संधी साधून नक्षलवाद्यांनी स्वत:चे वर्चस्व दाखवून देण्यासाठी काही खेडय़ांचा दौरा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. गडचिरोली जिल्हा जंगलाचा प्रदेश असून मोठय़ा नद्यांनी वेढलेला आहे. अतिवृष्टीच्या काळात गडचिरोलीला जबरदस्त तडाखा बसला. जिल्ह्य़ाचा संपर्क पुरामुळे तुटला होता. पुराचे पाणी, दलदल आणि रस्ते बंद असल्याने गस्तीवरील पथकांना दरवर्षी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यंदाची परिस्थिती अत्यंत भयंकर होती. त्यामुळे नक्षलविरोधी दलाची पथकांची गस्त मंदावली होती.
गेल्या काही महिन्यातील चकमकीत नक्षलवाद्यांची मोठी प्राणहानी आणि शस्त्रसाठय़ाचे नुकसान झाले आहे. गडचिरोलीत वर्चस्व ठेवून असलेले नक्षल गट यामुळे हादरले आहेत. पोलीस यंत्रणेने अतिशय आक्रमकपणे मोहिमा राबवून नक्षलवाद्यांचे खच्चीकरण केले आहे. त्यामुळे जिल्ह्य़ावरील प्रभुत्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी नक्षलवाद्यांनी  हालचाली सुरू केल्या असून य्नक्षलवाद्यांनी पावसाळ्याच्या काळात लेंगुडा, हलेवारा, कोटमी, अंकेपल्ली, वेदमपल्ली, नालगोंडा, रेणापल्ली, भटपार, जौंडे आणि मिडापल्ली या खेडय़ांमध्ये गावकऱ्यांच्या बैठका घेतल्याची माहिती मिळाली आहे.