येथील बाबुजी देशमुख वाचनालयाच्यावतीने मंगळवार, १५ ऑक्टोबरपासून नवरात्र व्याख्यानमालेचे आयोजन येथील प्रमिलाताई ओक सभागृहात करण्यात आले आहे. २३ ऑक्टोबपर्यंत रोज सायंकाळी ६ वाजता ही व्याख्याने होतील. महाराष्ट्रातील नामवंतांचे विचार ऐकण्याची संधी या निमित्ताने अकोलेकरांना मिळणार आहे. या व्याख्यानमालेचे हे ६८ वर्ष आहे, हे उल्लेखनीय. पहिल्या दिवशी, १५ ऑक्टोबरला पुण्याच्या विनया खडपेकर या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ या विषयावर विचार मांडतील. १६ ऑक्टोबरला पुण्याच्याच डॉ. मंगला आठलेकर या ‘स्त्रीच्या कोंडीला धर्मशास्त्रेच जबाबादार का’, याविषयी व १७ ऑक्टोबरला ‘महाभारतातील व्यक्तिरेखा’ या विषयी विचार मांडतील. १८ ऑक्टोबरला मुंबईच्या प्रा. जास्वंदी वांबुरकर यांचे ‘इतिहास: नवे प्रवाह, नव्या दिशा’ या विषयावर व्याख्यान होईल. १९ ऑक्टोबरला नंदुरबारच्या तळोदा येथील प्रतिभा िशदे यांचे ‘जल, जंगल, जमीन: आदिवासींच्या संदर्भात’ या विषयावरील विचार ऐकावयास मिळतील. २० ऑक्टोबरला औरंगाबादच्या सुनीता तगारे या ‘वंचितांचे विश्व’ या विषयावर विचार व्यक्त करतील. २१ ऑक्टोबरला पुण्याच्या प्रतिभा रानडे या ‘पाकिस्तान आणि अफगाणिस्तान: भौगोलिक आणि राजकीय वास्तव’ याविषयी विचार मांडतील. २२ ऑक्टोबरला अमरावतीच्या डॉ. विजया डबीर ‘रामायणातील स्त्रिया’ हा विषय मांडतील, तर २३ ऑक्टोबरला नागपूरच्या डॉ. रूपा कुळकर्णी या ‘कष्टकरी स्त्रियांचे आíथक व सामाजिक प्रश्न’ याविषयी विचार व्यक्त करतील. रसिकांनी या व्याख्यानांचा लाभ घ्यावा, अशी विनंती केली आहे.