बदलापूर पालिकेतील विषय समित्यांचे सदस्य निवडण्यासाठी बुधवारी झालेल्या सभेत चार समित्या शिवसेनेकडे तर २ समित्या भाजपकडे जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. पुढील आठवडय़ामध्ये याची औपचारिकता पूर्ण होऊ शकेल.
तहसीलदार अमित सानप यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची विशेष सभा पार पडली. नायब तहसीलदार विजय घुले, नगराध्यक्षा स्नेहा पातकर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व समित्यांवर ११ सदस्य निवडण्यात आले.
भाजप गटनेते राजेंद्र घोरपडे, शिवसेना गटनेते वामन म्हात्रे व राष्ट्रवादीचे गटनेते राजेंद्र चव्हाण यांनी सदस्यांची नावे दिली. स्थायी समितीवर भाजपतर्फे माजी नगराध्यक्ष राम पातकर, शिवसेनेतर्फे प्रकाश मर्गज आणि राष्ट्रवादीतर्फे शरद तेली यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सभापतींची औपचारिक निवड पुढील आठवडय़ात होण्याची अपेक्षा आहे. सार्वजनिक बांधकाम समिती शीतल राऊत, नियोजन समिती वामन म्हात्रे, पाणीपुरवठा समिती चंद्रकांत म्हात्रे, महिला आणि बालकल्याण समिती आरती टांकसाळकर या शिवसेनेच्या तर स्वच्छता व आरोग्य समिती राजेंद्र घोरपडे, शिक्षण समिती उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची सभापतीपदी वर्णी लागणार आहे.
मागासवर्गीय समिती सभापतीपदासाठी भाजपतर्फे स्वीकृत सदस्य संजय भोईर यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र स्वीकृत सदस्य सभापतीपदी राहू शकतो का ही तांत्रिक बाब चर्चेचा विषय होत आहे. नगराध्यक्षा स्नेहा पातकर स्थायी समितीच्या अध्यक्ष आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2014 रोजी प्रकाशित
बदलापूर पालिकेतील सत्तावाटप
बदलापूर पालिकेतील विषय समित्यांचे सदस्य निवडण्यासाठी बुधवारी झालेल्या सभेत चार समित्या शिवसेनेकडे तर २ समित्या भाजपकडे जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.
First published on: 23-05-2014 at 06:48 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur corporation power distribution