विदर्भाचा ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत्रा उत्पादनाच्या पट्टय़ात बंधारे बांधून पाणी साठविले नाही तर हा भाग काही वर्षांत वाळवंट बनल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.
राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रात शुक्रवारी फळ उत्पादकांशी संवाद साधताना गडकरी बोलत होते. कार्यक्रमाला कृषी संशोधन व शिक्षण संस्थेचे सचिव, महासंचालक डॉ. एस. अयप्पन, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बागवान विज्ञान विभागाचे उपमहासंचालक डॉ. एन.के. कृष्णकुमार, आमदार डॉ. अनिल बोंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विजय घोडमारे, सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, कापूस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. क्रांती, डॉ. एस.के. सिंग प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलताना गडकरी म्हणाले, या केंद्राने फळ उत्पादकांना त्यांच्या मागणीएवढी कलमे उपलब्ध करून द्यावी, संत्र्याचे उत्पादन एकसारखे असावे, केंद्राचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यत पोहोचावे, संयुक्त उपक्रम राबवावे, विविध उपक्रमांसाठी केंद्र सरकार सहकार्य करण्यास तयार आहे. सेंद्रीय पद्धतीने संत्रा उत्पादन घेण्याबाबतही उत्पादकांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. संत्र्यांचे विपणन योग्य पद्धतीने होण्याची गरज आहे. यासाठी केंद्र सरकार मदत करेल. विमा योजनेत सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमरावती जिल्ह्य़ातील वरूड, मोर्शी व नागपूर जिल्ह्य़ातील काटोल, कळमेश्वर या भागात संत्रा उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. यासाठी जमिनीतील पाण्याचा उपसा केला जात आहे. बंधारे उभारणी केली नाही तर हा भाग वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम. एस. लदानिया यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. गेल्या २८ वर्षांपासून केंद्र लिंबू, संत्रा, मोसंबी आणि लिंबूवर्गीय फळ उत्पादनांच्या संशोधनाचे काम करीत असून संत्र्याची ३० लाख रोपे शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत. विदर्भातील माती पाण्याचा लवकर निचरा न होणारी आहे. संत्र्याचे उत्पादन हेक्टरी १० लाख टनापर्यंत वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे डॉ. लदानिया म्हणाले.