राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणात परस्परांविरुद्ध उभे ठाकलेले काँग्रेस, शिवसेना आणि मनसे हे तिघे कट्टर शत्रू सध्या मात्र आपल्या समान शत्रूशी म्हणजे कम्युनिस्टांशी लढण्यासाठी हातात हात घालून एकत्र आले आहेत. या शत्रू-मित्रांच्या लढाईला कारण ठरले आहे ते मध्य रेल्वे कर्मचारी पतपेढीवरील प्रतिनिधी निवडण्यासाठी होत असलेल्या निवडणुकीचे.
‘मध्य रेल्वे कर्मचारी पतपेढी सोसायटी’ ही सुमारे १०० वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेली पतपेढी. हजारो कर्मचारी या पतपेढीचे सभासद आहेत. मुंबई, भुसावळ, नागपूर, जबलपूर, झाशी, इटारसी आदी डिव्हिजन्समध्ये या पतपेढीच्या शाखा आहेत. या पतपेढीचे भागभांडवल सुमारे ९० कोटी रुपयांचे तर खेळते भांडवल तब्बल १५०० कोटी रुपयांचे आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था अशी या संस्थेची ओळख आहे. विशेष म्हणजे या पतसंस्थेत ठेवीवर ११ टक्के व्याज मिळते तर कर्जाचा व्याजदर अवघा ६ टक्के आहे. त्यातही सकाळी कर्जासाठी अर्ज केला तर सायंकाळी कर्ज मंजूर होते, अशी या पतपेढीची ख्याती आहे.
या सगळ्या वैशिष्टय़ांमुळेच स्वाभाविकच या पतपेढीवरील वर्चस्वासाठी सर्वसंबंधित प्रयत्नशील आहेत. या पतपेढीवर पारंपरिक वर्चस्व कम्युनिस्टांच्या ‘नॅशनल रेल्वेमेन्स युनियन’ अर्थात एनआरएमयूचे आहे. या पतपेढीवर सगळ्या डिव्हिजन्समधून २७० प्रतिनिधी निवडले जातात. त्यापैकी सुमारे १७० प्रतिनिधी एनआरएमयूचे आहेत. अनेक वर्षे एनआरएमयूच्याच ताब्यात ही पतपेढी आहे. यंदा मात्र कम्युनिस्टांचे हे वर्चस्व हाणून पाडण्याचा चंग काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या कर्मचारी संघटनांनी बांधला आहे. त्यासाठीच एरवीच्या राजकारणात शत्रू असलेले हे तिघे एकत्र आले आहेत. या राजकीय रंगामुळे पतपेढीची उद्या, १८ जून रोजी होणारी निवडणूक रंगतदार बनली आहे.
मुंबई विभागातून या पतपेढीवर ८० प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. काँग्रेस-सेना-मनसे ‘परिवर्तन पॅनेल’मार्फत निवडणूक लढवत आहेत. तर एनआरएमयूला एससी-एसटी असोसिएशनने पाठिंबा दिला आहे.