फुकटय़ा प्रवाशांना चाप लावण्यासाठी मध्य रेल्वेने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या विविध उपनगरीय स्थानकांवर मुंबईशिवाय इतर विभागांतून आलेले २०० तिकीट तपासनीस तैनात करण्यात येणार आहेत. यासाठी मध्य रेल्वेने नागपूर, पुणे, भुसावळ, सोलापूर आदी विभागांतून तिकीट तपासनीसांची आयातही केली आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय व लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी मंजूर असलेल्या २५०० पदांपैकी सुमारे १००० पदे रिक्त असल्याने रेल्वे प्रशासनावर आता तिकीट तपासनीस आयात करण्याची वेळ आली आहे, अशी टीका रेल्वे कामगार संघटनांकडून होत आहे. मात्र ही कुमक फक्त उन्हाळी सुटय़ा लक्षात घेऊनच वाढवण्यात आल्याचे रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले असून हे तपासनीस तात्पुरते मुंबई विभागात काम करतील.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाडय़ांतून तब्बल ४० लाख प्रवासी दर दिवशी प्रवास करतात. यामध्ये फुकटय़ा प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. या फुकटय़ांना चाप लावण्यासाठी तिकीट तपासनीसांची अत्यंत गरज आहे. मात्र मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात उपनगरीय व लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये तिकीट तपासण्यासाठी २५०० तपासनीसांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी तब्बल १००० पदे रिक्त असल्याने फुकटय़ा प्रवाशांवर कारवाई करून मिळणारा दंडात्मक महसूल म्हणावा तेवढा मिळत नाही. उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता सध्या उपलब्ध असलेल्या तिकीट तपासनीसांना या प्रवाशांपैकी फुकटय़ा प्रवाशांना आवर घालणे शक्य होणार नाही.
तिकीट तपासनीसांची पदे एकदम वाढवणे शक्य नाही. त्यामुळे सध्याच्या तपासनीसांना मदतीचा हात देण्यासाठी मध्य रेल्वेने २०० तिकीट तपासनीसांची कुमक अन्य विभागांतून मागवली आहे. हे तिकीट तपासनीस कधी येतील आणि किती काळापर्यंत असतील, ही माहिती प्रशासनाने जाहीर केलेली नाही. गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वेवर पाच लाख ८८ हजार फुकटय़ा व अनधिकृत प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईतून रेल्वेला तब्बल २० कोटींची रक्कम दंडापोटी मिळाली होती.