वेगळ्या विदर्भ राज्यासाठी गुरुवारी चंद्रपुरात घेण्यात आलेल्या जनमत चाचणीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरात २४० ठिकाणी लावण्यात आलेल्या बुथवर सकाळपासून लोकांची गर्दी बघायला मिळाली. उद्या, २४ जानेवारीला एफईएस महाविद्यालयात मतमोजणी करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक संघ व विदर्भ राज्य संयुक्त समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी दिली.
अमरावती व नागपूरनंतर गुरुवारी चंद्रपूर येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकाराने जनमत कौल चाचणी राबविण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृती दिनानिमित्त या जनमत चाचणीसाठी महानगरपालिका क्षेत्रात २४० ठिकाणी बुथ लावण्यात आले होते. प्रत्येक बुथवर केंद्राधिकारी, सहाय्यक, प्रमुख आदी अधिकाऱ्यांसह मतपत्रिका, मतदान पेटी, मतदान केल्यानंतर मतदाराला लावण्यात येणारी शाई आदी साहित्य पुरविण्यात आले होते. सकाळी सात वाजतापासून सुरू झालेल्या या मतदान प्रक्रियेला शहरातील लोकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गांधी चौक, आझाद बगीचा, जटपुरा गेट, जयंत टॉकीज, पठाणपुरा, विठ्ठल मंदिर, बसस्थानक, रामनगर, सिंधी कॉलनी, तुकूम, बंगाली कॅम्प, अंचलेश्वर गेट, महाकाली मंदिर, भिवापूर, बाबूपेठ, वडगाव, वरोरा नाका, तसेच शहरातील सर्व शाळा महाविद्यालयात मतदानासाठी बुथ उघडण्यात आले होते. यावेळी विदर्भवाद्यांनी मतपेटीत भरघोस मतदान केले.
जनता स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने आहे, हे सत्ताधाऱ्यांना कळावे, या हेतूनेच ही चाचणी आयोजित करण्यात आली. ज्यांचा वेगळ्या विदर्भाला विरोध असेल अशानांही आपले विरोधी मत नोंदवण्याची सोय या मतपत्रिकेत करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिक संघाच्या या उपक्रमाला विदर्भ राज्य संयुक्त समिती, शेतकरी संघटना, सत्यशोधक समाज, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी, अशा विविध ३८ संघटनांनी पाठिंबा दिला. या शहरातील आमदार, खासदार, तसेच महापौर, सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकारी व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला. मनपाच्या सर्व प्रभागातून लोक मतदान करण्यासाठी उत्साहाने बाहेर पडतांना दिसत होती. मतदानाच्या सुरक्षिततेसाठी ज्येष्ठ नागरिक संघ, महाविद्यालयातील एनसीसी व एनएसएस पथक विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. सर्व बुथवरील मतदान शांततेत पार पडले. उद्या एफईएस महाविद्यालयात दुपारी दोन वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया चालणार आहे. ही यंत्रणा राबविण्यासाठी विदर्भ राज्य संयुक्त समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत कर्मचारी, विद्यार्थ्यांंचे सहकार्य मिळाले. यात शैक्षणिक संस्था व त्यातील कर्मचारी उत्साहाने मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले. यात प्रामुख्याने चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोक जीवतोडे अग्रेसर होते.
जिल्हाधिकाऱ्यांचा दोन्ही बाजूंनी कौल
जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी वेगळ्या विदर्भ व संयुक्त महाराष्ट्र, अशा दोन्ही बाजूने मतदान केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी जिल्हाधिकारी डॉ.म्हैसेकर यांच्याकडे मतदानासाठी गेले होते. सरकारी अधिकारी असल्यामुळे मला कोणत्याही एका बाजूने मतदान करता येणार नाही तेव्हा मी स्वतंत्र विदर्भ व संयुक्त महाराष्ट्र, अशा दोन्ही बाजूंनी मतदान करणार, असे स्पष्ट सांगितले. त्यावर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकर्त्यांनीही त्यांची ही अट मान्य करून दोन्ही बाजूने कौल देण्यास मंजुरी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2014 रोजी प्रकाशित
वेगळ्या विदर्भाच्या जनमत चाचणीला चंद्रपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वेगळ्या विदर्भ राज्यासाठी गुरुवारी चंद्रपुरात घेण्यात आलेल्या जनमत चाचणीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
First published on: 24-01-2014 at 08:14 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chadrapur peoples good response to separate vidarbh