राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपेठच्या टोल नाक्याचा मुद्दा आता पेटत चालला असून तळेगाव-अमरावती या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी ७२५ कोटी रुपयांचा निधी आणण्याचा दावा करणारे आमदार रावसाहेब शेखावत खोटारडे आहेत, असा आरोप मनसेने केला आहे. त्याला प्रत्युत्तर देत शहर काँग्रेस समितीने चर्चेसाठी मनसेला खुले आव्हान दिले. मनसेनेही हे आव्हान स्वीकारून उद्या शनिवारी, ११ मे रोजी येथील टाऊन हॉलमध्ये चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
तळेगाव-अमरावती या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी झालेल्या सुमारे ८८० कोटी रुपये खर्च झाला आहे. हा मार्ग बीओटी तत्त्वावर उभारण्यात आला असून त्याचा करारनामा २००९ मध्येच करण्यात आला होता. आयआरबी या कंत्राटदार कंपनीने करारनाम्यानुसार नुकतीच या मार्गावर टोलवसुली सुरू केली आहे. काँग्रेसचे आमदार रावसाहेब शेखावत यांनी ऑक्टोबर २०१० मध्ये पत्रकार परिषद घेऊन या कामासाठी ७२५ कोटी रुपये मंजूर करून आणल्याचा दावा करीत अमरावतीकरांची दिशाभूल केली होती, असा आरोप मनसेने केला आहे.
दुसरीकडे शहर काँग्रेस समितीने रावसाहेब शेखावत यांच्या वतीने हा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न चालवला आहे. रावसाहेब शेखावत यांनी या रस्त्याच्या कामासाठी ७२५ कोटी रुपये आणले, असे कधीही म्हटले नव्हते, असा खुलासा काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. नागपूर-अमरावती या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे तिसऱ्या टप्प्यातील तळेगाव-अमरावती पर्यंतचे काम संथगतीने सुरू होते. या मार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढले होते, हे काम जलदगतीने व्हावे, यासाठी रावसाहेब शेखावत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री कमलनाथ आणि नंतर सी.पी. जोशी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता, त्यावेळी हे काम बीओटी तत्त्वावर असल्याचे आणि त्यासाठी लागणारी रक्कम कंत्राटदाराला खर्च करायची असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले होते. रावसाहेब शेखावत यांच्या पाठपुराव्यामुळेच महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू झाले, असा दावा देखील शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय अकर्ते यांनी केला आहे.
मनसेने चर्चेसाठी खुले आव्हान दिल्यानंतर चर्चेसाठी स्थळ आणि वेळ तुम्हीच सांगा असे प्रतिआव्हान काँग्रसतर्फे देण्यात आले. त्यावर मनसेचे जिल्हा संघटक पप्पू पाटील आणि जिल्हाध्यक्ष प्रवीण तायडे यांनी ११ मे रोजी या विषयावर टाऊन हॉलमध्ये खुली चर्चा ठेवली आहे.
काँग्रेसने या रस्त्याचे काम बीओटी तत्त्वावर असल्याची कबुली दिल्याने एकप्रकारे मनसेने केलेले आरोप सिद्धच झाले आहेत, असे पप्पू पाटील यांचे म्हणणे आहे. रावसाहेब शेखावत यांनी ७२५ कोटी रुपये आणल्याचा दावा केला होता, हे वृत्तपत्रांमधून प्रकाशित झाले आहे. त्यांचा केवळ श्रेय घेण्याचा प्रयत्न होता. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार टोल नाक्याची जागा महापालिकेच्या हद्दीपासून १० कि.मी. अंतरावर असावी, पण नांदगावपेठ टोल नाक्याच्या बाबतीत ते पाळले गेलेले नाही. या टोलनाक्यामुळे एमआयडीसी परिसर आणि मोर्शी-वरूड कडे जाणाऱ्या प्रवाशांना नाहक भरुदड सहन करावा लागत आहे. त्याचा फटका उद्योगांनाही बसणार आहे.
मनसेने चर्चेसाठी रावसाहेब शेखावत यांना बोलावले होते, पण काँग्रेस समितीने चर्चेस तयारी दर्शवली आहे. या चर्चेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचेही स्वागत असल्याचे पप्पू पाटील यांनी म्हटले आहे. आता या विषयावर उद्या शनिवारी काय खल होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th May 2013 रोजी प्रकाशित
नांदगावपेठ टोल नाक्यावरून काँग्रेस-मनसेत आव्हान-प्रतिआव्हान
राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपेठच्या टोल नाक्याचा मुद्दा आता पेटत चालला असून तळेगाव-अमरावती या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी ७२५ कोटी रुपयांचा निधी आणण्याचा दावा करणारे आमदार रावसाहेब शेखावत खोटारडे आहेत, असा आरोप मनसेने केला आहे.
First published on: 11-05-2013 at 03:30 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challanges between congress mns on nandgaonpeth toll plaza