येत्या शैक्षणिक सत्रापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वेकोलिच्या एरिया हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात येणार आहे. नोडल ऑफिसर डॉ. प्रदीप दीक्षित यांनी वेकोलिचे व्यवस्थापकीय संचालक दिनेशचंद्र गर्ग यांच्याकडे एरिया हॉस्पिटल तीन वर्षांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली, तर स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या हॉस्पिटलची पाहणी करून तसा अहवाल पाठविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक सत्रापासून सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. आजवर या महाविद्यालयासाठी जागाच निश्चित होत नव्हती. तत्कालीन जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी बायपासवर पागलबाबानगर येथे २५ एकर जागा या महाविद्यालयाला दिली, परंतु माजी खासदार नरेश पुगलिया यांचा या जागेला विरोध होता. मात्र, आता या जागेवर एकमत होताच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तेही २०१४-१५ या शैक्षणिक सत्रापासून वैद्यकीय महाविद्यालय कुठल्याही परिस्थितीत सुरू करायचेच, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. गेल्या महिन्यात २२ नोव्हेंबरला मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ.एस.राव यांच्या नेतृत्वाखाली डॉ.एम.डी.श्रीगिरीवार, नोडल ऑफिसर डॉ. पी.जी. दीक्षित व नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अन्य तीन डॉक्टरांचा समावेश असलेली समिती येऊन गेली. या समितीला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. टी.जी. धोटे, डॉ. अनंत हजारे, डॉ. बंडू रामटेके यांनी तुकूम येथील डॉ. पंकज भोयर यांच्या इंदिरा इंस्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयाची इमारत, तसेच आंबेडकर भवन व शहरातील अन्य काही इमारती दाखविल्या. यातील दोन इमारतींना समितीने पसंती दर्शविली असली तरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी हॉस्पिटलची गरज आहे.
या समितीला वेकोलिचे एरिया हॉस्पिटल अधिक सोयीस्कर वाटले. त्यामुळे नोडल ऑफिसर डॉ. प्रदीप दीक्षित यांनी दोन दिवसापूर्वी ग्रामीणचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेके यांना वेकोलिचे एरिया हॉस्पिटल बघून या आणि तसा अहवाल पाठविण्यास सांगितले. डॉ. रामटेके यांनी या हॉस्पिटलला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेतली. या हॉस्पिटलचे एकूण क्षेत्रफळ, तेथे रुग्णांसाठी असलेल्या वार्डाची संख्या, ओपीडी कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष, रुग्णांना थांबण्याच्या दृष्टीने सोयीसुविधा, चंद्रपूर बसस्थानक व रेल्वे स्थानकापासून एरिया हॉस्पिटलचे अंतर, तसेच तेथील मनुष्यबळ, वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या परिचर व परिचारिकांची संख्या, औषधालय, रक्तपेढी व अन्य विभागाची माहिती व छायाचित्रे घेतल्यानंतर लगेच ती डॉ. दीक्षित यांना अहवाल स्वरूपात पाठविण्यात आली. ही सर्व माहिती बघून डॉ. दीक्षित यांनी वेकोलिचे व्यवस्थापकीय संचालक दिनेशचंद्र गर्ग यांना पत्र लिहून एरिया हॉस्पिटल तीन वर्षांसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
हे हॉस्पिटल सर्वच दृष्टीने सोयीस्कर असल्याने वेकोलिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत पूर्ण होईस्तोवर किमान तीन वर्षांसाठी तरी एरिया हॉस्पिटल द्यावे, अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे. त्यामुळे या वैद्यक महाविद्यालयासाठी वेकोलिची ही इमारत जवळपास निश्चित झाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नोडल ऑफिसर डॉ. प्रदीप दीक्षित यांच्याशी संपर्क साधला असता वेकोलिचे व्यवस्थापकीय संचालक दिनेशचंद्र गर्ग यांना पत्र लिहून एरिया हॉस्पिटल तातडीने उपलब्ध करून देण्यासंदर्भात विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले. वेकोलिकडून सकारात्मक होकार येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तो येताच काम सुरू होणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच इंदिरा इंस्टिटय़ूट व अन्य काही जागाही बघितल्या आहेत, परंतु इंदिरा इंस्टिटय़ूटने भाडय़ापोटी मोठी रक्कम मागितल्याने अजूनही निर्णय झालेला नाही. इतर काही इमारतींवर विचार सुरू असल्याची माहिती दिली, तर डॉ. बंडू रामटेके यांनीही एरिया हॉस्पिटलसंदर्भात सविस्तर माहिती पाठविल्याचे लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Dec 2013 रोजी प्रकाशित
वेकोलि एरिया हॉस्पिटलमध्ये सुरू होणार
येत्या शैक्षणिक सत्रापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वेकोलिच्या एरिया हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात येणार आहे. नोडल ऑफिसर

First published on: 18-12-2013 at 10:15 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur medical college at vekolki area hospital