ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरामध्ये लहान मुले पळविणारी एक टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. विशेषत कळवा-मुंब्र्यातील गरीब वस्त्यांना या टोळीने लक्ष्य केले असून ठाण्यात वागळे, लोकमान्यनगरसारखी ठिकाणे या टोळीने लक्ष्य केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दिव्यातील वस्त्यांमध्येही ही टोळी सक्रिय असल्याचा संशय वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत असून या मुलेचोरांचा छडा लावण्यासाठी ठाणे पोलिसांनी त्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
मुंब्रा तसेच दिवा परिसरातून दोन लहान मुले बेपत्ता झाल्याच्या घटना गेल्या महिनाभरात घडल्या आहेत. त्यापैकी एका मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. या मुलाला दोन जणांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. त्यामुळे दिवा तसेच मुंब्रा परिसरात लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय झाल्याचा संशय येऊ लागल्याने पोलिसांनी त्याची चाचपणी सुरू केली आहे. मुंब्रा परिसरात मोहन (बदललेले नाव) राहत असून त्यांना तीन मुली आणि एक तीन वर्षीय मुलगा अशी अपत्ये आहेत. त्यांचा तीन वर्षांचा मुलगा अचानकपणे बेपत्ता झाला. मोहन यांच्या घरासमोरच गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. ६ सप्टेंबर रोजी मंडपामध्ये तो खेळत असताना बेपत्ता झाला. त्याचा अजूनही शोध लागलेला नाही. याच भागात कार्यरत असलेल्या एका कचरावेचक महिलेने त्याला पळवून नेल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. त्यामुळे या महिलेचे रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे. दिवा परिसरात रहाणारा १२ वर्षीय अजय (बदललेले नाव) हा नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी निघाला होता. घरापासून काही अंतरावर दोन जणांनी त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. अपहरण करणाऱ्या दोघा व्यक्तींच्या हाताला चावा घेत अजयने स्वत:ची सुटका केली आणि सुखरूप घरी परतला. सप्टेंबर महिन्यात ही घटना घडली.
या प्रकरणात सहभागी असलेल्या अपहरणकर्त्यांची रेखाचित्रे पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. महिनाभरात घडलेल्या दोन्ही घटनांमुळे पोलीसही चक्रावले असून त्यांना दिवा तसेच मुंब्रा परिसरात लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय झाल्याचा संशय आहे. याच पाश्र्वभूमीवर त्यांनी विशेष पथके तयार केली असून त्यामध्ये १० ते १५ जणांचा समावेश आहे. या दोन्ही घटनांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या रेखाचित्रातील व्यक्तींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. त्यासाठी मुंब्रा तसेच दिवा परिसरातील पानटपऱ्या, दुकाने आणि खबऱ्यांचा आधार घेण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2014 रोजी प्रकाशित
मुले चोरणारी टोळी सक्रिय
ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरामध्ये लहान मुले पळविणारी एक टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. विशेषत कळवा-मुंब््रयातील गरीब वस्त्यांना या टोळीने लक्ष्य केले असून ठाण्यात वागळे, लोकमान्यनगरसारखी ठिकाणे या टोळीने लक्ष्य केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
First published on: 27-09-2014 at 12:22 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children trafficking gang active