सत्तेसाठी काँग्रेसवाले नेहमीच अल्पसंख्याक समाजाची मते घेतात. परंतु त्यांना हक्काची घरकुले किंवा इतर कल्याणकारी योजना देताना टाळाटाळ करतात. अल्पसंख्याकांसाठी दुसरे कोणी काम करीत असतील तर त्यात अडथळा आणतात, असा आरोप सिटूचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केला. सोलापुरात २२ हजार ५०० अल्पसंख्याक महिला कामगारांसाठी घरकुलांचा प्रकल्प मंजूर करून आणल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सोमवारी पार्कजवळ चार हुतात्मा पुतळ्यांमागे पार्क जिमखान्यासमोर खुल्या मैदानात आयोजित अल्पसंख्याक महिला कामगारांच्या सभेत ते बोलत होते.
हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांच्या नावाने स्थापन केलेल्या या महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्पाला केंद्राचा हिरवा कंदील दाखविला असताना राज्य शासन आडकाठी आणत होते. त्यामुळे राज्य शासनाच्या विरोधात आडम मास्तर यांनी सोलापूर ते मुंबई थेट लाँगमार्च जाहीर केला होता. त्यानुसार सकाळी या लाँगमार्चमध्ये सहभागी होण्यासाठी हजारापेक्षा अधिक अल्पसंख्याक महिला कामगार आपल्या कच्च्याबच्च्यांसह आले होते.दरम्यान, काल मुंबईत वर्षां बंगल्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आडम मास्तर यांना चर्चेसाठी निमंत्रित केले. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी येत्या ३० जूनपर्यंत सोलापूरच्या अल्पसंख्याक महिला कामगारांच्या घरकूल योजनेला मंजुरी देऊन शिफारशीसह प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याची ग्वाही देत सोलापूर-मुंबई लाँगमार्च मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार हे आंदोलन तूर्त मागे घेण्यात आल्याचे आडम मास्तर यांनी सोलापुरातील सभेत जाहीर केले.
मुंबईच्या लाँगमार्चमध्ये सहभागी होण्यासाठी हजारापेक्षा अधिक अल्पसंख्याक महिला कामगार चार पुतळ्यांजवळ सकाळी दाखल झाल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर लढण्याची ऊर्मी दिसत होती. मात्र हे आंदोलन तूर्त स्थगित झाल्याने सर्व महिला घरी परतल्या. तत्पूर्वी झालेल्या सभेत आडम मास्तर यांनी आपल्या घणाघाती भाषणात काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. अल्पसंख्याक महिला कामगारांनी घरकुल प्रकल्पासाठी अकरा कोटींची रक्कम जमा करून सिटू कार्यालयात भरली. या विश्वासाला जीवात जीव असेपर्यंत तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र अशी विश्वासार्हता सोलापूरच्या एका तरी काँग्रेसवाल्याकडे आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सोलापूरचे खासदार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह अन्य काँग्रेसचे पुढाऱ्यांना, भले ते स्वत: अल्पसंख्याक समाजाचे असूनदेखील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी काही करता येत नाही आणि ते आम्हालाही करू देत नाहीत. या योजनेत तेच अडथळे आणत आहेत. मात्र अल्पसंख्याक महिला भगिनींचा माझ्यावरच विश्वास आहे. म्हणूनच त्यांनी अकरा कोटींची रक्कम जमा करून दिल्याचे आडम मास्तर यांनी सांगितले.