ठाणे आणि अंबरनाथ स्थानकात सोमवारी उपनगरी रेल्वे सेवा अडविण्याचा प्रयत्न करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे भाडेवाढीचा निषेध केला. सीएसटी स्थानकातून ठाण्यात दाखल झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ठाणे स्थानकात घोषणा, पथनाटय़ करत आंदोलन केले तर अंबरनाथ स्थानकामध्ये सकाळी सव्वा नऊच्या सुमारास काँग्रेस कार्यकर्त्यांनी सीएसटीला जाणारी ९.३४ ची लोकल आंदोलन करत १५ मिनिटे रोखून धरली. विशेष म्हणजे पोलिसांनी आंदोलकांना कोणतीही आडकाठी केली नाही. तसेच या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
ठाणे स्थानकात सव्वा बाराच्या सुमारास सीएसटीहून निघालेले आंदोलक दाखल झाले. रेल्वे भाडेवाढीला विरोध करणारे फलक, घोषणा आणि पथनाटय़ सादर करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. पोलिसांची अपुरी संख्या आणि बंदोबस्ताचा अभाव यावेळी ठाणे स्थानकामध्ये होता. त्यामुळे तिकीट तपासनीसांनीही या आंदोलकांना तिकिटे विचारण्याचे धाडस केले नाही. अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे आणि कार्यकर्त्यांच्या मोठय़ा संख्येमुळे आंदोलकांवर कारवाई करणे शक्य झाले नसल्याचे तिकीट तपासनीसांकडून सांगण्यात आले. तसेच सकाळी अंबरनाथ स्थानकांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्थानक परिसरात निदर्शने करत अंबरनाथ स्थानकातून सुटणाऱ्या लोकलसमोर आंदोलन केले. मात्र यामुळे कोणत्याही प्रकारचा रेल रोको झाला नसल्याचे कल्याण पोलिसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jun 2014 रोजी प्रकाशित
रेल्वे दरवाढीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन
ठाणे आणि अंबरनाथ स्थानकात सोमवारी उपनगरी रेल्वे सेवा अडविण्याचा प्रयत्न करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे भाडेवाढीचा निषेध केला.
First published on: 24-06-2014 at 06:28 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress protest against railway fare hike