तालुक्यातील घोटी येथे आठवडे बाजारातील गर्दीचा फायदा घेत दुकानदाराचे लक्ष विचलित करून सोन्याचे दागिने लंपास करण्याचा चार महिलांचा प्रयत्न दुकानदारांच्या दक्षतेमुळे फसला. या चारही संशयितांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्या पंचवटीतील रहिवासी आहेत.
शनिवारी घोटीचा आठवडे बाजार होता. बाजारातील गर्दीचा फायदा घेत सकाळच्या सुमारास सराफ बाजारातील महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात चार महिला शिरल्या. या महिलांनी आपणास घाई असून लवकर दागिने दाखविण्याचा हट्ट धरला. त्यांच्यापैकी एकीने आपल्याजवळील लहान बालकाला रडविले. बालकाच्या रडण्यामुळे सर्वाचे लक्ष विचलित झाले असता एका महिलेने दुकानाच्या काऊंटरमध्ये ठेवलेला एक तोळे सोन्याचा हार लंपास केला. हार गायब झाल्याचे लक्षात आल्यावर या चारही महिलांची वागणूक दुकानमालक सुभाष नागरे यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी दुकान बाहेरून बंद करत महिलांना थांबवून ठेवले. पोलिसांना त्यांनी सर्व प्रकार कळविल्यावर पोलिसांनी दुकानात येऊन महिलांची झडती घेतली असता एका महिलेकडे २७ हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार मिळाला. घोटी पोलिसांनी शांताबाई काळे (५०), सुरेखा पवार (२०), ताई चव्हाण (२१) आणि गौरी रामदास भोसले (१८) या सर्वाना ताब्यात घेतले. हे सर्व नाशिकच्या पंचवटी भागातील रहिवासी आहेत. अनोळखी व्यक्तीपासून सावध राहून अशा संशयास्पद व्यक्तीची माहिती पोलिसांना कळविण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Oct 2014 रोजी प्रकाशित
दुकानदाराच्या दक्षतेने दागिने चोरणाऱ्या महिलांना अटक
तालुक्यातील घोटी येथे आठवडे बाजारातील गर्दीचा फायदा घेत दुकानदाराचे लक्ष विचलित करून सोन्याचे दागिने लंपास करण्याचा चार महिलांचा प्रयत्न दुकानदारांच्या दक्षतेमुळे फसला.
First published on: 14-10-2014 at 07:02 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime news