मुलांचा शाळेतील प्रवेश रद्द केल्यानंतर त्यासाठी घेतलेले प्रवेशशुल्क परत देण्यास नकार देणाऱ्या मीरा-भाईंदर येथील एका शाळेला ठाणे ग्राहक मंचाने दणका देत शाळेची ही कृती म्हणजे गैरप्रकार असल्याचा ठपका ठेवला आहे. दोन्ही मुलांच्या प्रवेशशुल्काचे १६ हजार रुपये तर शाळेने परत करावेतच; शिवाय नुकसानभरपाई म्हणून आणखी सहा हजार रुपये महिन्याभरात देण्याचा आदेश मंचाने शाळा व्यवस्थापनाला दिला आहे.
शिवडी येथे राहणाऱ्या चित्रलेखा बेनगाडे यांच्या दोन्ही मुलांना ‘सेव्हन स्क्वेअर अॅकॅडमी’च्या शिशुवर्गात २२ जानेवारी २००९ रोजी प्रवेश मिळाला. त्यासाठी प्रवेशशुल्क म्हणून बेनगाडे यांनी १६ हजार रुपये भरले. त्याची पावतीही शाळेने त्यांना दिली. परंतु शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी बेगनाडे यांनी काही व्यक्तिगत व आरोग्याच्या कारणास्तव दोन्ही मुलांचा प्रवेश रद्द करण्याची आणि प्रवेशशुल्क परत करण्याची विनंती शाळा व्यवस्थापनाकडे केली. मात्र शुल्काबाबतच्या माहिती पुस्तिकेत ‘प्रवेश रद्द केल्यानंतर प्रवेशशुल्क परत मिळणार नाही’, असे स्पष्ट नमूद केले असल्याचे सांगत शाळा व्यवस्थापनाने बेनगाडे यांना प्रवेशशुल्क परत करण्यास नकार दिला. वारंवार विनंती करूनही निर्णय बदलण्यास आणि प्रवेशशुल्क परत करण्यास शाळा तयार नसल्याने बेनगाडे यांनी अखेर ग्राहक न्यायालयात शाळा प्रशासनाविरुद्ध तक्रार दाखल केली.
बेनगाडे यांच्या तक्रारीची दखल घेत ग्राहक न्यायालयाने शाळा प्रशासनाला आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्या वेळीही शाळा प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम होते. प्रवेश देण्यापूर्वीच
प्रवेश रद्द करण्यात आल्यास प्रवेशशुल्क परत मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचा दावा शाळेने केला. शाळेचे हे म्हणणे न्यायालयाने मान्य केले, परंतु त्याच वेळी बेनगाडे यांच्या मुलांना केवळ प्रवेश देण्याव्यतिरिक्त त्यांना शाळेकडून कुठल्याही सुविधा देण्यात आल्या नव्हत्या. उलट बेनगाडे यांनी शाळा सुरू होण्यापूर्वी खूप दिवस आधीच मुलांचा प्रवेश रद्द करीत असल्याचे शाळेला कळविले होते, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. या पाश्र्वभूमीवर बेनगाडे यांना प्रवेशशुल्क परत करण्यासह नुकसानभरपाई शाळेला द्यावी लागेल, असे आदेश न्यायालयाने दिले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Apr 2014 रोजी प्रकाशित
प्रवेश रद्द केल्यानंतर शुल्क परत न करणाऱ्या शाळेला ग्राहक मंचाचा दणका
मुलांचा शाळेतील प्रवेश रद्द केल्यानंतर त्यासाठी घेतलेले प्रवेशशुल्क परत देण्यास नकार देणाऱ्या मीरा-भाईंदर येथील एका शाळेला ठाणे ग्राहक मंचाने दणका देत शाळेची ही कृती म्हणजे गैरप्रकार असल्याचा ठपका ठेवला आहे.
First published on: 15-04-2014 at 06:18 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Customer forum bump to the schools