नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी धर्मनिरपेक्ष जनता दलाने नाशिक प्रादेशिक प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याकडे केली आहे.
शहरात एका बाजूला प्री-पेड रिक्षा सेवेसारखा चांगला उपक्रम सुरू झाला असताना दुसरीकडे रिक्षा व टॅक्सी चालकांकडून अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याकडे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे शहराध्यक्ष एकनाथ येवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. शहरातील बहुतेक रिक्षा व टॅक्सी चालक हे अवैध प्रवासी वाहतूक व जादा प्रवासी बसवून वाहतूक करतात. रात्रीच्या वेळी रिक्षा चालविणाऱ्या अनेकांकडे वैध कागदपत्रे नसतात. तसेच ५० टक्के गाडय़ांची पात्रता संपलेली असून त्यांची कागदपत्रे व विमा यांची मुदत संपलेली आहे. या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या कायद्यानुसार कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर संबंधितांच्या संघटना मोर्चा काढून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. दोन वर्षांमध्ये रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांच्या बाबतीत अनुचित प्रकार घडले आहेत. परवाना नसतानाही प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध किरकोळ स्वरूपाची कारवाई केली जाते. त्यामुळे यंत्रणेचा दबाव राहात नाही. विनापरवाना धावणाऱ्या वाहनांच्या मालकांवरही दावा दाखल करण्यात यावा अशी मागणीही येवले यांनी केली आहे. रात्रीच्या वेळी शहरात गुन्हेगार शोध मोहीम राबविताना बिगरपरवाना वाहतूक करणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी व त्याच्या चारित्र्याबाबत तपासणी करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
नाशिक शहर वाहतूक विभाग नेहमीच मनुष्यबळ कमी असल्याचे कारण दाखवून अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात कारवाई करीत नाही. त्यामुळे शहरात संघटनांचेच वर्चस्व झाले आहे.
बंगळूरू पद्धतीप्रमाणे प्रत्येक रिक्षा व टॅक्सीवर त्याच्या मालकी हक् काबाबतचे संगणकीय बारकोड स्टीकर लावण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.