कोल्हापूर महानगरपालिकेमधील सुवर्ण जयंती रोजगार योजनेमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या संचालिकेची चौकशी करून निलंबित करावे, या मागणीसाठी मंगळवारी शहर भाजपाच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. सभेचे कामकाज सुरू असतानाच उपमहापौर दिगंबर फराकटे व काही नगरसेवकांनी आंदोलकांची भेट घेऊन याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
महानगरपालिकेमध्ये सुवर्ण जयंती रोजगार योजनेंतर्गत विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. शहरी रोजगार योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांना लघु उद्योगाकरिता २ ते १० लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य केले जाते. त्यामध्ये ३० टक्के अनुदान दिले जाते. गेल्या १० वर्षांच्या कालावधीत या योजनेंतर्गत शेकडोकर्ज प्रकरणे करण्यात आली असून त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप भाजपाच्या वतीनेकेला जात आहे. यासंदर्भात आयुक्त, उपायुक्त, महापौर यांच्याकडे निवेदने देतानाच अनेक आंदोलनेही केली आहेत.
या विभागाच्या संचालिका शारदा पाटील या काही एजंट मार्फत हा भ्रष्टाचार घडवीत आहेत, असा भाजपाचा आरोप आहे. १९९७ पासून मंजूर करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणांपैकी बहुतांशी कर्ज प्रकरणे थकीत आहेत. इतकेच नव्हे तर एकाच व्यक्तीच्या नावाने तीन वेळा कर्ज घेण्यात आला आहे. बोगस कर्जव्यवहार करताना संबंधित व्यक्तीची शिधापत्रिका, छायाचित्रे उपलब्ध केली आहेत. कर्ज घेतले नसताना या व्यक्तीच्या मागे कर्ज वसुलीचा ससेमिरा सुरू आहे. त्यामुळे या बोगस व्यवहारामध्ये हात गुंतलेल्या संचालिका शारदा पाटील यांना निलंबित करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
 महापालिकेचे कामकाज आज सुरू असतानाच भाजपाचे कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकारी व महिला महापालिकेसमोर जमल्या. संचालिका शारदा पाटील यांना निलंबित करा, अशा घोषणा दिल्या जात होत्या. या आंदोलनात शहर भाजपाचे अध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक सुभाष रामुगडे, नगरसेविका प्रभा टिपुगडे, अ‍ॅड.संपतराव पवार, संदीप देसाई, संतोष भिवटे, अशोक देसाई, डॉ.शेलार, महिला आघाडी अध्यक्षा मधुमती पावनगडकर, डॉ.संगीता गायकवाड आदींचा समावेश होता.
आंदोलकांची भेट घेऊन उपमहापौर फराकटे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तर महेश जाधव यांनी शारदा पाटील यांना निलंबित न केल्यास महापालिकेसमोर उपोषण सुरू करण्याचा तसेच या प्रकरणी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला.

Story img Loader