गावात कचऱ्याचे साचलेले ढीग, सांडपाण्याची गटारे, नियमित होत नसलेली नाल्याची साफसफाई यासह इतर कारणामुळे नांदुरा तालुक्यातील मेंढळीत डासांचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे गावात दीडशेहून अधिक नागरिकांना डेंग्यूसदृश्य तापाची लागण झाली आहे. यापैकी नऊ रुग्णांची प्रकृती गंभीर असून सात रुग्णांवर औरंगाबाद तर दोन रुग्णांवर बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सरू आहेत.
गावात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर तापाची लागण झाली असतानादेखील आरोग्य विभागाने कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. ग्रामपंचायत प्रशासनाचे गावातील साफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे. एका पाठोपाठ एक रुग्ण आजारी पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नांदुरा शहरापासून काही अंतरावर तीन ते चार हजार लोकसंख्येचे मेंढळी हे गाव आहे. या गावातील साफसफाईकडे ग्रामपंचायत प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. नाल्याची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे गावात गटाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहेत. सांडपाण्याच्या गटारातून मोकाट जनावरे मुक्त संचार करीत आहेत. परिणामी मोठय़ा प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या दोन दिवसापासून गावातील दीडशेहून अधिक नागरिकांना डोकेदुखी व तापाने ग्रासून टाकले आहे.
गावातील प्रत्येक घरातील एक रुग्ण तापाने फणफणत आहे. दोन दिवसापासून डोकेदुखी व ताप आल्याने गावातील भाऊराव सोयस्कार (३२), संदीप किन्होळकर (२२) या दोघांना नांदुरा येथील रुग्णालयात दाखल केले होते. परंतु त्या ठिकाणी निदान न झाल्याने त्यांना बुलढाणा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांच्या तपासण्या केल्या असता त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान करण्यात आले आहे. सध्या दोघांची प्रकृती अत्यावस्थ आहे. गावातील सात रुग्णांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मेंढळी गावात नागरिकांना तापाची लागण झाली असतानादेखील ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने कुठलीही उपाययोजना केलेली नाही. एका पाठोपाठ एक रुग्ण तापाला बळी पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यूसदृश तापाच्या साथीने रौद्ररूप धारण करण्याअगोदर आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक पाठवून साथीला आळा घालावा, अशी मागणी होत आहे.