आबा-भुजबळ यांची व्यवस्था शेजारीशेजारी
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पाच दिवसावर आले असताना कॅबिनेट मंत्र्याचे निवासस्थान असलेल्या रविभवनातील परिसर आणि खोल्या सुशोभित करण्यावर अंतिम हात फिरवला जात आहे. रविभवनातील खोल्यांचे वाटप करण्यात आले असून देवगिरीवर दावा करणाऱ्या सार्वजानिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि गृहमंत्री आर.आर. पाटील यांची निवास व्यवस्था आजूबाजूला करण्यात आली आहे. त्यामुळे देवगिरी रिकामा राहणार की काय याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.
हिवाळी अधिवेशन १० डिसेंबरपासून प्रारंभ होत असून नागभवन आणि रविभवनातील केवळ कागदावर खोल्यांचे वाटप करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र खोल्यांच्या बाहेर मंत्र्याच्या नावाच्या पाटय़ा लावण्यात आलेल्या नाहीत. रविभवनात एरवीही बैठका आणि मंत्र्यांची ये-जा असल्याने रविभवन परिसर नेहमीच मंत्र्यांची बडदास्त ठेवण्यासाठी सज्ज असला तरी अधिवेशनाच्या काळात मात्र या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्थेसह वर्दळ असते. रविभवनातील काही कॉटेजमध्ये रंगरंगोटी व डागडुजीचे काम सुरू आहेत. रविभवनमधील खोल्यांवर रंगरंगोटी आणि सुशोभित करण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जात असून मंत्र्यांचे आदरतिथ्य करण्यासाठी अधिकारी कामाला लागले आहेत.
रविभवनमध्ये कुटीर क्रमांक १ मध्ये उद्योगमंत्री नारायण राणे, कुटीर २- सार्वजानिक बांधकाम मंत्री छगन भूजबळ, कुटीर ३- गृहमंत्री आर.आर. पाटील. कुटीर ४- वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, कुटीर क्रमांक ५ सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, कुटीर ६- कृषी मंत्री -राधाकृष्ण विखे पाटील, कुटीर ७- ग्रामीण विकास मंत्री ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील, कुटीर ८- सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, कुटीर ९-राज्य उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक, कुटीर १० महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कुटीर ११- पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे , कुटीर १२- अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, कुटीर १३- जयदत्त क्षिरसागर, कुटीर १४- उत्पादन शुल्क मंत्री मनोहर नाईक, कुटीर १५ – वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजय गावित, कुटीर क्रमांक १६ – सुनील तटकरे, कुटीर २१ रामराजे नाईक निंबाळकर, कुटीर क्रमांक २४ – बबनराव पाचपुते, कुटीर २५ – राजेश टोपे, कुटीर २६ शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, कुटीर २७ मो. नसीम आरिफ खान, कुटीर क्रमांक २८ सुरेश शेट्टी, कुटीर २८ – हसन मुश्रीफ, कुटीर क्रमांक ३० रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत.
नागभवनमध्ये कुटीर क्रमांक १ – मधुकर चव्हाण, कुटीर २ – पदमाकर वळवी, कुटीर ३- वर्षां गायकवाड, कुटीर ४ सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे, कुटीर ५- रणजित कांबळे, कुटीर ६ भास्कर जाधव, कुटीर ७ प्रकाश सोळंकी, कुटीर ८ – सचिन अहीर, कुटीर ९ – शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, कुटीर १० – गुलाबराव देवकर, कुटीर ११ सतेज पाटील, कुटीर १२ – राजेंद्र मुळक याप्रमाणे सर्व बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे.
अन्य मंत्र्यांपैकी रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख या दोन कॅबिनेट मंत्र्यांचे आणि अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे निवासस्थान नागपुरात आहे त्यामुळे त्यांच्या बंगल्याचा केवळ कार्यालयीन कामे वा शिष्टमंडळाना भेटीगाठीसाठीच उपयोग होण्याची शक्यता आहे. रविभवन परिसरात मोठे २३ सूटस असून यावेळी दोन सूट्स वाढविण्यात आले आहे. हैद्राबाद हाऊसमध्ये सचिवालय असले, तरी अनेक मंत्री याठिकाणी बसूनच त्यांच्या विभागाच्या फाईल्स मागवून अधिकाऱ्यांशी चर्चा करून, शिष्टमंडळाना भेटणे यासारखी सर्व महत्वाची कामे या ठिकाणीच होतात. त्यामुळे विधानभवन परिसरानंतर रविभवन परिसरात मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. सचिवालयात विविध विभागांची कामकाजाला सुरूवात झाली असली, तरी रविभवनात वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कॉटेजेसमध्ये लवकरच संगणक आणि इतर व्यवस्था करण्यात येणार आहे.