न्यूयार्क येथे भारतीय वाणिज्य दुतावासातील अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांना अपमानजनक पद्धतीने अटक केल्याचा कॉन्फेडरेशन ऑफ दलित एनजीओजने (सीडनी) तीव्र निषेध केला आहे.
डॉ. देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेसंदर्भात ‘सीडनी’ संघटनेचे राष्ट्रीय निमंत्रक प्रा. दिलीप बारसागडे, विभागीय समन्वयक रोहिदास राऊत, जिल्हाप्रमुख काशीनाथ देवगडे, डी.बी. मेश्राम, वसंत खोब्रागडे, बंडू दामले आदींनी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला. या निवेदनात ‘सीडनी’ने म्हटले आहे की, डॉ. देवयानी लहान मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना त्यांना अपमानजनक पद्धतीने अटक करण्यात आली. ही अटक म्हणजे जिनिव्हा कराराचा भंग असून भारतीय दूतावासातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अपमानित करण्याची अमेरिकेतील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी माजी राष्ट्रपती कलाम यांनाही अमेरिकेने अपमानित केले होते.
दिल्ली महानगर न्यायालयाने डॉ. देवयानी खोब्रागडे यांची मोलकरीण संगीता रिचर्ड हिला सप्टेंबरमध्ये फरार घोषित करून तिच्याविरुद्ध वारंट जारी केला आहे. हा वारंट अमेरिकेत बजावण्यासाठी अमेरिकेने मदत करावी, अशी विनंती डॉ. देवयानी खोब्रागडे यांनी केली असतानाही त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली.
डॉ. देवयानी खोब्रागडे यांनी यापूर्वी जर्मनी, इटली व पाकिस्तानात अतिशय प्रशंसनीय काम केले असून कुशल अधिकारी म्हणून त्या परिचित आहेत. त्यांना अटक करणे म्हणजे भारतीयांना हीन लेखण्याचा प्रकार असून या संदर्भात भारताने जाब विचारावा, अशी मागणी ‘सीडनी’ने केली आहे. निवेदनाच्या प्रती अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल, केंद्रीय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद, राज्यमंत्री ई.अहमद, प्रणीत कौर यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.